बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डात झालेल्या वादात आयसीसीच्या तंटा निवारण लवादाने बीसीसीआयच्या पारड्यात आपलं वजन टाकलं. मात्र यानंतर 2023 साली होणाऱ्या क्रिकेट यजमानपदाचे हक्क बीसीसीआय गमावून बसण्याची शक्यता आहे. 2016 साली भारतात झालेल्या टी-20 विश्वचषकादरम्यान देण्यात आलेल्या करमुक्तीची भरपाई आयसीसीने बीसीसीआयकडे 161 कोटी रुपयांची मागणी केली आहे. हे पैसे या वर्षाच्या अखेरीस न भरल्यास 2023 साली होणाऱ्या विश्वचषकाचे हक्क बीसीसीआयकडून काढून घेण्यात येतील असा इशारा आयसीसीने दिला आहे.
क्रिकेट प्रशासकीय समिती आणि बीसीसीआय यांच्याकडे ही रक्कम भरण्यासाठी आता अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. मात्र ही रक्कम न भरल्यास बीसीसीआयला मिळणाऱ्या वार्षिक आर्थिक मोबदल्यात कपात केली जाईल असंही आयसीसीने स्पष्ट केलंय. 2021 साली होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2023 साली होणारा विश्वचषक यांचं यजमानपद भारताकडे देण्यात आलं आहे. मात्र करमुक्तीची भरपाई न दिल्यास बीसीसीआय आपल्या यजमानपदाचे हक्क गमावून बसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आयसीसीने दिलेल्या इशाऱ्यावर बीसीसीआय काय पावलं उचलतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.