Babar Azam PCB Chairman Zaka Ashraf Rift: पाकिस्तान क्रिकेट संघ विश्वचषकात चांगली कामगिरी करत नाही, पण तरीही त्यांच्या बातम्या माध्यमांमध्ये नक्कीच चर्चेत असतात. बाबर आझम याचे खासगी व्हॉट्सअॅप चॅट लीक झाल्याचा दावा पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनीने केला आहे. या दाव्यानुसार, पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबीचे सीओओ सलमान नसीर यांच्याशी चर्चा केली होती. आता पीसीबीने या प्रकरणी अधिकृत निवेदन जारी केले आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिनी आणि काही पत्रकार करत असलेले हे दावे चुकीचे असल्याचे पीसीबीचे म्हणणे आहे. “बाबर आझमचे लीक झालेले व्हॉट्सअॅप चॅट खोटे आणि बनावट आहेत”, असे त्यांनी म्हटले आहे.
बाबरच्या लीक झालेल्या चॅटवर पीसीबीचे वक्तव्य
पीसीबीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम आणि पीसीबीचे सीओओ सलमान नसीर यांच्यातील लीक झालेली व्हॉट्सअॅप चॅट पूर्णपणे खोटे आणि बनावट आहेत. काही विघ्नसंतोषी लोकांनी त्यांच्या वाईट हेतूने त्याचा वापर केला आहे.” बाबर आझमच्या व्हॉट्सअॅप चॅट लीक केल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानी वृत्तवाहिनी आणि पत्रकारांबाबत पीसीबीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “त्यांनी ही वाहिनी आणि पाकिस्तानच्या पत्रकारांशी काहीही देणेघेणे नाही. पीसीबीचे अध्यक्ष झका यांचा बाबर आझमच्या या खोट्या चॅटशी काहीही संबंध नाही.”
पुढे पीसीबीच्या निवेदनात म्हटले आहे की, “अश्रफ आणि सलमानबरोबर व्हॉट्सअॅपवर कोणताही संवाद झालेला नाही.” पीसीबीने पुढे लोकांना आवाहन केले आहे की, “या खोट्या अफवांकडे दुर्लक्ष करा आणि विश्वचषक खेळण्यासाठी भारतात गेलेल्या पाकिस्तान संघाला आणि कर्णधार बाबर आझमला पाठिंबा द्या.”
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू वकार युनूस यानेही पाकिस्तानचा विद्यमान कर्णधार बाबर आझमला पाठिंबा दिला आहे. ट्वीटरवर व्हायरल होत असलेल्या बाबरच्या लीक व्हॉट्सअॅप चॅटवर भाष्य करत वकार युनूसने लिहिले की, “तुम्ही लोक काय करण्याचा प्रयत्न करत आहात, हे कळतंय का? ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. हे असं करून तुम्ही लोक आनंदी झाला असाल पण यातून देशाची बदनामी होते. कृपया बाबर आझमला एकटे सोडा, त्याच्या मागे लागू नका. तो पाकिस्तान क्रिकेटचा स्टार खेळाडू आहे.” या पोस्टमध्ये वकारने पीसीबी, पीसीबीचे अधिकारी आणि बाबरबद्दल अशा बातम्या पसरवणाऱ्या पाकिस्तानी वाहिनीला टॅग केले असून त्यावर टीका केली आहे.
काय होतं त्या चॅटमध्ये?
नसीर बाबरला त्या फेक चॅटमध्ये म्हणाला की, “बाबर, टीव्ही आणि सोशल मीडियावर अशा बातम्या येत आहेत की तुम्ही अध्यक्षांना फोन करत आहात आणि ते उत्तर देत नाहीत. तुम्ही त्यांना मागील काही दिवसात फोन केला होता का?” या संवादात त्या वृत्तवाहिनीच्या निवेदकाने सांगितले की यात बाबरची प्रतिक्रिया होती. बाबर त्यात म्हणाला की, “सलाम सलमान भाई, मी एकही फोन केला नाही सर.” कार्यक्रमादरम्यान, पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू अझहर अली यांनी बाबर आझमचे खासगी संभाषण थेट प्रसारित करण्याआधी पीसीबी प्रमुखांची संमती मिळाली होती का किंवा घेतली होती का? असा प्रश्न उपस्थित केला. यामुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठे वादळ आले आहे.