वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात मानहानीकारक पराभव झाल्यानंतर पाकिस्तान संघाचे निवड समितीचे प्रमुख मोइन खान एका कॅसिनोमध्ये गेले होते आणि नव्या वादाला तोंड फुटले होते. याबाबत पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) मोइन यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते; पण योग्य स्पष्टीकरण न देता आल्यामुळे त्यांना मायदेशी परतण्याचे आदेश पीसीबीने दिले आहेत.
‘‘आम्ही मोइन यांना कॅसिनोमध्ये जाण्याबाबत स्पष्टीकरण विचारले होते आणि मी तिथे रात्री जेवायला गेलो असल्याचे त्यांनी सांगितले होते; पण आम्हाला असे वाटले की, पाकिस्तानचा संघ अडचणीत असताना त्यांचे वागणे हे त्या वेळेला अनुचित नव्हते, कारण त्या वेळी संघाला दोन मानहानीकारक पराभव स्वीकारावे लागले होते आणि देशवासीयांमध्ये तीव्र नाराजी होती,’’ असे पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांनी सांगितले.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात दीडशे धावांनी पराभूत झाल्यावर मोइन हे एका कॅसिनोमध्ये गेले असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केले होते. त्यानंतर पीसीबीने त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले होते आणि त्यानंतर त्यांना पीसीबीने मायदेशी परतण्याचे आदेश दिले आहेत.
ते पुढे म्हणाले की, ‘‘मोइन यांच्यावर आम्हाला टीका करायची नाही; पण निवड समितीचे अध्यक्ष आणि संघाबरोबर एक वरिष्ठ अधिकारी म्हणून त्यांनी काळजीपूर्वक वागायला हवे होते. त्यांच्या मायदेशी परतण्यामुळे संघाच्या कामगिरीवर काही परिणाम होणार नाही, असे आम्हाला वाटते.’’

Story img Loader