न्यूझीलंडचा पाकिस्तान दौरा शेवटच्या क्षणी रद्द झाल्याने निराश झालेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष रमीझ राजा यांना दुहेरी धक्का बसला आहे. आता इंग्लंडनेही पाकिस्तानचा दौरा रद्द केला आहे. या गोष्टीनंतर राजा भडकले असून त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. राजा म्हणाले, ”पाश्चात्य गट एकवटला आहे असे दिसते आणि आमच्या संघाचे मुख्य लक्ष्य आता तीन संघांना पराभूत करणे आहे.”

एक व्हिडिओ संदेश देत राजा म्हणाले, “याआधी आमचा शेजारी भारत हा एक संघ आमच्या निशाण्यावर होता, आता यात न्यूझीलंड आणि इंग्लंड हे दोन संघ जोडले गेले आहेत.” याव्यतिरिक्त राजा यांनी एक ट्वीटही केले. ते म्हणाले, ”आम्ही इंग्लंडमुळे निराश आहोत, त्यांनी महत्त्वाच्या क्षणी दिलेल्या वचनाचे पालन केले नाही आणि क्रिकेट बिरादरीच्या सदस्याला निराश केले. यातूनही आपण नक्कीच बाहेर पडू. पाकिस्तान क्रिकेट जगातील सर्वोत्तम संघ होण्यासाठी हा एक वेक-अप कॉल आहे, जेणेकरून उर्वरित संघ कोणतेही निमित्त न करता आमच्यासोबत खेळण्यासाठी रांगा लावतील.”

हेही वाचा – विराट कोहलीला होती ‘गंभीर’ दुखापत, ‘या’ पुस्तकातून झाला खुलासा!

‘‘इंग्लंडच्या पुरुष आणि महिला संघांच्या पाकिस्तानात होणाऱ्या अतिरिक्त सामन्यांविषयी चर्चा करण्यासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाची बैठक पार पडली. यामध्ये झालेल्या चर्चेनुसार ऑक्टोबरला होणाऱ्या या दौऱ्यातून माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’’ असे ‘ईसीबी’ने म्हटले. इंग्लंडचा संघ २००५ नंतर प्रथमच पाकिस्तानचा दौरा करणार होता. १३, १४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध त्यांचे दोन ट्वेन्टी सामने होणार होते. दौरा रद्द करण्याच्या या निर्णयाबद्दल ‘ईसीबी’ने पाकिस्तान क्रिकेट मंडळाची माफी मागितली आहे.

न्यूझीलंडचा पाकिस्तान दौरा पुढील वर्षी?

न्यूझीलंड संघाने मागील शुक्रवारी पाकिस्तान दौऱ्यातून अचानक माघार घेतली होती. पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी काही तास न्यूझीलंडने सामन्यात खेळण्यास नकार दिला. परंतु न्यूझीलंडचा संघ तीन एकदिवसीय आणि पाच ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी पुढील वर्षी पाकिस्तान दौरा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट यांनी दिली.

Story img Loader