भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट वैर सर्वश्रुत आहे. जेव्हा-जेव्हा दोन्ही संघ एकमेकांशी भिडतात, तेव्हा मैदानावरील रोमांच शिगेला असतो. जगभरातील चाहतेही या क्षणाची वाट पाहत आहेत. आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये दोन्ही संघांची शेवटची गाठ पडली होती. आता आपल्याला दरवर्षी या दोन संघांमधील क्रिकेट सामने पाहता येणार असल्याचे संकेत आहेत.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष आणि पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीझ राजा यांना दरवर्षी चार देशांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका आयोजित करायची आहे, ज्यामध्ये पाकिस्तान आणि भारताच्या संघांचाही समावेश आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मालिकेत भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने सहभागी व्हावे, असे राजांनी सांगितले.
रमीझ राजा यांनी ट्विटरवर लिहिले, ”नमस्कार मित्रांनो! भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात दरवर्षी खेळल्या जाणाऱ्या चार देशांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सुपर सीरिजचा मी प्रस्ताव देईन. ही मालिका चार देशांद्वारे रोटेशनच्या आधारावर आयोजित केली जाईल, त्याचे महसूल मॉडेल वेगळे असेल, ज्यामध्ये सर्व सहभागी देश आयसीसीसोबत नफा शेअर करतील.”
हेही वाचा – IPL 2022 : लखनऊ रेंजर्स की लखनऊ पँथर्स? गौतम गंभीरनं केला टीमच्या नावाचा खुलासा!
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा सामना आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ दरम्यान पाहायला मिळाला होता. भारत आणि पाकिस्तानचे संघ नुकतेच आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांसमोर आहेत. या विश्वचषकात पाकिस्तानने भारताला हरवले. याआधी कोणत्याही विश्वचषकात पाकिस्तानला भारताला हरवता आले नव्हते.