क्रिकेट मालिकेबाबत पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान यांनी भारताला भेट दिली होती. त्यानंतर त्यांच्या वक्तव्यामध्ये दिसून आलेल्या कटुतेबद्दल शहरयार यांना आंतर प्रांत समन्वय मंत्रालयाकडूनच कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष शशांक मनोहर यांनी दिलेल्या निमंत्रणावरून शहरयार भारतात आले होते. मात्र त्या वेळी झालेल्या राजकीय निदर्शनांमुळे ही भेट अयशस्वी ठरली होती. त्यामुळे भारत-पाक मालिकेबाबत कोणताच तोडगा निघाला नाही. ही भेट घेण्यापूर्वी शहरयार यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र किंवा गृहमंत्रालयाबरोबर चर्चा केली होती का? असा प्रश्न त्यांना नोटिशीमध्ये विचारण्यात आला आहे.
आंतर प्रांतीय समन्वयमंत्री मियान रियाझ पीरजादा यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. त्यांनी शहरयार यांना भारत भेटीचा संपूर्ण तपशील मागितला आहे. ‘‘शहरयार यांनी या भेटीला जाण्यापूर्वी तेथील सुरक्षा व्यवस्था, संभाव्य निदर्शने आदी गोष्टींचा आढावा घेण्याची आवश्यकता होती,’’ असे पीरजादा यांनी म्हटले आहे. शहरयार यांनी एकतर्फी निर्णय घेत देशाची प्रतिमा मलिन केली आहे.
पीरजादा यांनी पाठविलेल्या पत्राबाबत शहरयार निराश झाले आहेत. याबाबत त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली असल्याचे समजते.

Story img Loader