टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताविरोधातील सामन्यात पाकिस्तान संघाने कडवी झुंज दिल्याबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांनी कौतुक केलं आहे. भारताने या सामन्यात चार गडी राखून पाकिस्तानचा पराभव केला. विराट कोहलीने केलेली दमदार फलंदाजी आणि हार्दिक पांड्यासोबत केलेल्या शतकी भागीदारीने विजयात मोलाचा वाटा उचलला. मेलबर्न क्रिकेट मैदानात हा सामना पार पडला. या विजयासोबत भारत संघ दोन गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
“दर्जेदार! तुम्ही काही सामने जिंकता आणि काहींमध्ये पराभव होतो. हा खेळ क्रूर आणि अन्यायकारक असू शकतो याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. पाकिस्तान संघ यापेक्षा उत्तम खेळी करु शकत नव्हता. त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा अभिमान आहे,” असं रमीज राजा यांनी ट्वीमध्ये म्हटलं आहे.
मेलबर्नमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव करत वर्ल्डकपची दमदार सुरूवात केली. विराट कोहलीने ५३ चेंडूत ८२ धावा केल्या. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
पाकिस्तानने भारतासमोर १६० धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारतीय संघाची सुरूवात खराब झाली होती. भारताचे दोन्ही सलामीवीर प्रत्येकी ४ धावा करून माघारी परतले होते. नसीम शाहने केएल राहुल तर हारिस रौफने कर्णधार रोहित शर्माला बाद केलं. रोहित – राहुल बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार मारत धडाकेबाज सुरूवात केली. मात्र १० चेंडूत १५ धावा केल्यानंतर हारिस रौफने त्याला तंबूत पाठवलं. अक्षर पटेलला बढती देऊन पाचव्या क्रमांकावर पाठवण्यात आलं होतं. मात्र तो केवळ दोन धावा करून बाद झाला. दरम्यान विराट कोहलीने ५३ चेंडूत नाबाद ८२ धावा केल्या. तसंच हार्दिक पंड्याने ४० धावांचे योगदान दिले.
शेवटच्या षटकामधील थरार
भारताला विजयासाठी अखेरच्या षटकात १६ धावांची गरज होती. डावखुरा फिरकीपटू मोहम्मद नवाजने पहिल्या चेंडूवर हार्दिकला (३७ चेंडूंत ४० धावा) बाद केले. हार्दिक आणि कोहलीने ११३ धावांची भागीदारी रचली. त्यानंतरच्या दोन चेंडूंवर मिळून तीन धावाच निघाल्या. मात्र, नवाजचा पुढील चेंडू ‘नो-बॉल’ ठरला. कमरेवरील हा चेंडू कोहलीने सीमारेषेबाहेर पोहोचवला. त्यानंतर नवाजने वाइड चेंडू टाकला. भारताला तीन चेंडूत पाच धावांची गरज असताना नवाजने कोहलीच्या यष्टी उडवल्या. मात्र, चेंडू ‘फ्री-हिट’ असल्याने कोहली बाद झाला नाही, शिवाय चेंडू यष्टीला लागून मागच्या दिशेने गेल्याने भारताला तीन धावा मिळाल्या. पुढील चेंडूवर दिनेश कार्तिक बाद झाला. मात्र, त्यानंतर वाइड चेंडू आणि मग अश्विनने एक धाव काढून भारताचा विजय सुनिश्चित केला.