२०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे. अशा स्थितीत भारतीय संघ पाकिस्तानात खेळायला जाणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष रमीझ राजा यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. रमीझ राजा म्हणाले की, आयसीसी स्पर्धा पाकिस्तानात असताना भारतीय संघ माघार घेऊ शकत नाही.
पत्रकार परिषदेत रमीझ राजा म्हणाले, ”भारतासोबत द्विपक्षीय मालिका होणे अवघड आहे, पण तिरंगी मालिका कधीही होऊ शकते. आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा विचार केला, तर त्यातून बाहेर पडणे सोपे नाही. कारण त्या परिस्थितीत दबाव असतो. या सर्व बाबी मंडळासमोर आणल्या आहेत आणि तसे होईल असे वाटत नाही.”
हेही वाचा – IND vs NZ : द्रविड आणि दूरदृष्टी..! टॉस जिंकताच रोहितनं दिला इशारा; म्हणाला ‘‘पुढच्या वर्ल्डकपवर…”
सौरव गांगुलीशी झालेल्या संभाषणाच्या मुद्द्यावर रमीझ राजा म्हणाले, ”आम्ही अनेक गोष्टींवर बोललो आहोत आणि जागतिक क्रिकेटला कसे पुढे नेऊ शकतो यावरही चर्चा झाली आहे. सर्वांसाठी लाभ असावा. क्रिकेटपटू हे या पदांवर बसलेले असतात आणि त्यांच्याशी संबंध असल्याने संभाषण सोपे होते. जोपर्यंत राजकीय अडथळे आहेत, तोपर्यंत ते सोपे होणार नाही.”
आयसीसीच्या पुढील वर्तुळाच्या कार्यक्रमाच्या वेळापत्रकात पाकिस्तानला स्पर्धेचे यजमानपदही मिळाले आहे. २०२५ मध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तेथे आयसीसीचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नाही. तीन स्पर्धांच्या यजमानपदाचा अधिकारही भारताला मिळाला आहे. यामध्ये वनडे, टी-२० वर्ल्डकप आणि चॅम्पियन ट्रॉफीचा समावेश आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध क्रिकेटमध्ये किती काळ कटू राहतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.