लाहोर : पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष झाका अश्रफ गुरुवारी भारतासाठी रवाना झाले. या दौऱ्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्याशी चर्चा करून दोन देशांतील क्रिकेट संबंध भक्कम करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे अश्रफ म्हणाले.
एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुचर्चित सामना शनिवारी अहमदाबाद येथील सव्वा लाख आसनक्षमता असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याला उपस्थित राहण्यासाठी ‘बीसीसीआय’ने अश्रफ यांना निमंत्रण दिले आहे. तसेच अश्रफ यांनी बुधवारी ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांच्याशी संवाद साधला आहे. शहा यांनी अश्रफ यांचे स्वागत केले.
हेही वाचा >>> World Cup 2023 : गेलकडूनच प्रेरणा! षटकारांच्या विक्रमामागे खूप मेहनत; रोहितची प्रतिक्रिया
‘‘आगामी सामना हा भारत आणि पाकिस्तान या देशांतील क्रिकेट संबंध भक्कम करण्याची उत्तम संधी आहे. मी आणि जय शहा यांनी याबाबत चर्चा केली आहे. विश्वचषकासारख्या मोठय़ा स्पर्धेत पाकिस्तानचा संघ खेळत आहे. अध्यक्ष म्हणून संघाला पाठिंबा दर्शवणे हे माझे कर्तव्य आहे. या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या खेळाडूंनी खूप मेहनत घेतली आहे आणि त्याग केले आहेत. आमचे खेळाडू स्पर्धेत आपली सर्वोत्तम आणि देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी करतील याची खात्री आहे,’’ असे झाका अश्रफ म्हणाले. ‘पीसीबी’चे अध्यक्ष २०१६ सालानंतर प्रथमच भारतात आले आहेत.
पाकिस्तानच्या पत्रकारांची ‘व्हिसा’ प्रक्रिया सुरू
एकदिवसीय विश्वचषकातील सामन्यांना उपस्थित राहता यावे याकरिता भारताच्या ‘व्हिसा’साठी अर्ज केलेल्या पाकिस्तानच्या पत्रकारांशी इस्लामाबाद येथील भारतीय उच्चायुक्तालयाने संपर्क करण्यास सुरुवात केली आहे. यापैकी दोघांनी आपला ‘व्हिसा’ निश्चित झाल्याचे सांगितले आहे. तसेच अन्य काही पत्रकारांशी उच्चायुक्तालयाकडून फोनवर संवाद साधण्यात आला आहे. मात्र, ‘व्हिसा’ मिळण्यात इतका विलंब होत असल्याने काही पाकिस्तानी पत्रकारांनी भारतात जाण्याचा आपला निर्णय बदलल्याचे एका पत्रकाराकडून सांगण्यात आले.