पीटीआय, कराची

चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा २०२५च्या यजमानपदावर शिक्कामोर्तब करण्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) विनंती करतानाच भारताने कुठल्याही कारणाने खेळण्यास नकार दिल्यास नुकसानभरपाई मिळायला हवी, अशी मागणी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) केली आहे.‘पीसीबी’चे अध्यक्ष झाका अश्रफ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सलमान नसीर यांनी अलीकडेच अहमदाबाद येथील बैठकीदरम्यान ‘आयसीसी’च्या कार्यकारी समितीची भेट घेतली होती. भारतीय संघाच्या संभाव्य नकाराचा विचार करूनच या बैठकीत चर्चा करण्यात आली. ‘आयसीसी’ने या वेळी एकतर्फी निर्णय घेऊ नये असे आवाहनही ‘पीसीबी’च्या वतीने करण्यात आल्याचे समजते.

‘‘भारताने सुरक्षेच्या कारणास्तव माघार घेतल्यास या वेळी ‘पीसीबी’ला नुकसानभरपाई मिळायला हवी. ‘आयसीसी’ने स्वतंत्र सुरक्षा समिती नियुक्त करून पाकिस्तानातील सुरक्षेचा आढावा घ्यावा आणि त्यानंतर भारताच्या विरोधास उत्तर द्यावे. गेल्या दोन वर्षांत अनेक प्रमुख संघ पाकिस्तानात खेळून गेले आहेत. त्यांना सुरक्षेची अडचण जाणवली नाही,’’ हे ‘पीसीबी’ने ‘आयसीसी’च्या निदर्शनास आणून दिल्याचे सूत्रांनी सांगितले.भारताने या वर्षी आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे स्पर्धेतील बहुतांश सामने श्रीलंकेत खेळवण्यात आले. स्पर्धेतील केवळ चार सामने पाकिस्तानात झाले होते.आशिया चषक स्पर्धेत आम्ही झुकलो, या वेळी आम्ही मागे हटणार नाही आणि यजमानपदाचा हक्क सोडणार नाही. त्यामुळे ‘आयसीसी’ने यजमानपदाच्या करारावर शिक्कामोर्तब करावे अशी गळही झाका यांनी या वेळी घातल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.दरम्यान, चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी पाकिस्तानात जायचे की नाही हा निर्णय पूर्णपणे सरकारच्या भूमिकेवर अवलंबून असेल, असे ‘बीसीसीआय’च्या एका पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले.

Story img Loader