गोलंदाजीच्या सदोष शैलीप्रकरणी पाकिस्तानी फिरकीपटू सईद अजमलवर घालण्यात आलेल्या बंदीविरुद्ध दाद मागण्याचा निर्णयावरून पाकिस्तानी क्रिकेट मंडळाने घुमजाव केले आहे. एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला आणि पाकिस्तानच्या गोलंदाजीची भिस्त असलेल्या अजमलच्या गोलंदाजी शैलीबाबत गेल्या महिन्यात गॉल येथील श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) त्याच्या गोलंदाजीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आयसीसीच्या या निर्णयाविरोधात आपण दाद मागणार असल्याचे पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले होते.  ”अजमलवर बंदी हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का म्हणावा लागेल. या बंदीविरोधात आम्ही दाद मागणार आहोत,” असे पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांनी सांगितले होते.
ब्रिस्बेन येथील नॅशनल क्रिकेट केंद्रात गोलंदाजीचे परीक्षण करणाऱ्या आयसीसीच्या तज्ज्ञांनी त्याच्या गोलंदाजीचे वैयक्तिकपणे परीक्षण केल्यानंतर अजमलवर बंदी घातली होती. आता गोलंदाजीत सुधारणा केल्यानंतर अजमलला पुनर्परीक्षणासाठी आयसीसीकडे दाद मागता येईल. ”वैयक्तिकपणे अजमलच्या गोलंदाजीचे परीक्षण केल्यानंतर त्याची गोलंदाजी शैली सदोष असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्याला कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यांत गोलंदाजी करता येणार नाही,” असे आयसीसीच्या पत्रकात म्हटले होते. नियमांनुसार गोलंदाजी करताना अजमलचे मनगट १५ अंशापेक्षा जास्त वळत असल्याचे समोर आले होते.
अपघातामुळे आपला हात नैसर्गिकपणे वळत असून आयसीसीच्या गोलंदाजी आढावा समितीकडे याविषयी दाद मागण्यात येईल, त्या वेळी निकाल आपल्या बाजूने लागेल, अशी आशा अजमलला वाटत आहे.
अजमल पाकिस्तानकडून ३५ कसोटी सामने खेळला असून त्याने १७८ बळी मिळवले आहेत. तसेच १११ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर १८३ बळींची नोंद आहे. ६३ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्येही त्याने ८५ विकेट्स मिळवले आहेत. गेल्या तीन वर्षांत सर्वाधिक विकेट्स अजमलने मिळवले आहेत. २००९मध्ये पदार्पणाच्याच वर्षी अजमलच्या गोलंदाजीच्या शैलीविषयी पहिल्यांदा आक्षेप घेण्यात आला होता. पण पर्थ येथील वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाने त्याची गोलंदाजी शैली योग्य असल्याचा निकाल दिला होता. जून महिन्यात झालेल्या बैठकीत गोलंदाजी शैलीविषयी मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर आयसीसीने नियमात बदल करून गोलंदाजीच्या शैलीविषयी पंच आणि सामनाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतलेल्या गोलंदाजांच्या शैलीचे ब्रिस्बेन येथे जैवयांत्रिकी पद्धतीद्वारे परीक्षण केले जात आहे. गेल्या काही महिन्यांत श्रीलंकेचा ऑफस्पिनर सचित्र सेनानायके आणि न्यूझीलंडचा केन विल्यम्सन यांची गोलंदाजी शैली वादग्रस्त ठरवण्यात आली होती.

Story img Loader