पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय यांच्यात आगामी काळात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दोन देशांमध्ये करण्यात आलेल्या सामंजस्य कराराचं उल्लंघन केल्याप्रकरणी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बीसीसीआयविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात आहे. पाकिस्तान क्रिकेड बोर्डाचे अध्यक्ष नजीम सेठी यांनी ही माहिती दिली. सध्या बीसीसीआयवर कारवाई करण्यासाठी आम्ही सर्व उपलब्ध कायदेशीर मार्गांचा विचार करत असल्याचे सेठी यांनी स्पष्ट केले. दोन देशांमधला हा वाद पाकिस्तान आयसीसीच्या तंटा निवारण समितीकडे नेणार असल्याचे कळते. आयसीसी दरबारात या प्रकरणी न्याय मिळाला नाही, तर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा विचार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेली ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आल्याचे समजते. शशांक मनोहर बीसीसीआयचे अध्यक्ष असताना दोन देशांच्या क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांमध्ये शेवटची बैठक झाली होती. त्यानंतर मात्र बीसीसीआयने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे पुढील दोन महिन्यांच्या काळात पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आयसीसीकडे या प्रकरणाची तक्रार करणार आहे.

आयसीसीकडे या प्रकरणाची तक्रार आल्यास प्रस्तावित नियमांनुसार पहिल्यांदा दोन्ही देशांच्या संघटनाना प्रकरण सामंजस्याने मिटवण्याची संधी दिली जाईल. मात्र यातूनही काही तोडगा न निघाल्यास आयसीसी ३ सदस्यीय समितीची स्थापना करेल आणि या समितीने दिलेला निर्णय हा दोन्ही बोर्डांसाठी बंधनकारक असेल. तसेच या समितीच्या निर्णयाला दोन्ही बोर्डांना आव्हान देता येणार नाही.

बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार २०१५ ते २०२३ या कालावधीत दोन्ही देशांनी सहा मालिका खेळणे अपेक्षित होते. या सहापैकी चार मालिका या पाकिस्तानात तर दोन मालिका या भारतात खेळवल्या जाणार होत्या. मात्र दोन्ही देशांमधील बिघडलेल्या राजकीय संबंधामुळे भारत-पाक सामन्यांना केंद्र सरकारने परवानगी नाकारली. त्यामुळे दोन्ही देशांमधला हा वाद आयसीसीच्या दरबारी पोहोचल्यानंतर यावर काय निर्णय घेतला जातो हे पाहावे लागणार आहे.

Story img Loader