पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सध्या जोरदार तयारीला लागलं आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंडने ऐनवेळी दौरा रद्द केल्याने संपूर्ण जगात नाचक्की झाली होती. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड एक एक करत पावलं पुढे टाकण्यास सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ २४ वर्षानंतर पाकिस्तानात येणार आहे. दुसरीकडे इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी बोलणी पुन्हा एकदा सुरु झाली आहे. त्यात न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाशी चर्चा करणार असल्याचं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी सांगितलं आहे. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड महिला प्रिमिअर लीग सुरु करण्याच्या तयारीत आहे.
“महिलांसाठी पीएसएल सुरू करण्याचा आमचा विचार आहे. आशियात महिला टी २० साठी फ्रेंचाइसी लीग सुरु करणारं पहिलं क्रिकेट बोर्ड बनू शकतो. तर अंडर-१९ पीएसएल सुरू करण्याची तयारी आहे. यात इंग्लंडचे खेळाडूही सहभागी होतील. ही सुद्धा पहिलीच स्पर्धा असेल. यावेळेस ऑस्ट्रेलिया महिलांसाठी बिग बॅश लीग आयोजित करत आहे. तर इंग्लंडने पुरुषांसोबत महिलांसाठी द हंड्रेड स्पर्धेचं आयोजन केलं होतं”, असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी सांगितलं.
दुसरीकडे, बीसीसीआय महिलांसाठी आयपीएल सुरु करण्यासाठी तयारी करत आहे. यात ४ ते ५ संघांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी बीसीसीआयने २०१८ मध्ये टी २० चॅलेंज सुरु केली होती. पहिल्या पर्वात फक्त एक सामना झाला. २०१९ आणि २०२० मध्ये तीन संघात ४ सामने झाले. २०२० मध्ये भारतासह दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, बांगलादेश, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि थायलंडचे खेळाडू खेळले होते.