न्यूझीलंड क्रिकेट संघाने मागील शुक्रवारी म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी पहिल्या एकदिवसीय सामन्यातील पहिला चेंडू टाकण्यास काही तासांचा अवधी असताना पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. हा एकतर्फी निर्णय असल्याची टीका पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) केली आहे. रावळपिंडी स्टेडियमवर पहिला एकदिवसीय सामना वेळेवर चालू झाला नाही. दोन्ही संघ हॉटेलमध्येच थांबले होते. शनिवारी न्यूझीलंडचा संघ मायदेशी परतला. १८ वर्षांनंतर न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर तीन एकदिवसीय आणि पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिका खेळणार होता. न्यूझीलंडने ही माघार घेतल्यानंतर यावरुन दोन्ही देशांमध्ये बराच वाद झाला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने न्यूझीलंडच्या संघावर चांगली आगपाखड केल्याने नवीन वाद निर्माण झाला. मात्र आता त्यानंतर याच मालिकेसंदर्भातील एक नवीन वाद समोर आळाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तानमधील वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार न्यूझीलंड संघाच्या पाकिस्तान दौऱ्यासाठी तैनात करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांवर झालेल्या खर्चासंदर्भातील धक्कादायक आकडेवारी समोर आलीय. दौरा रद्द करुन मायदेशी परतलेला न्यूझीलंडचा संघ आठ दिवस पाकिस्तानमध्ये होता. या आठ दिवसाच्या कालावधीमध्ये न्यूझीलंडच्या संघाला सुरक्षा पुरवणाऱ्या सुरक्षारक्षकांनी तब्बल २७ लाखांची बिर्याणी खाल्ल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. हा दावा पाकिस्तानमधील २४ न्यूज एचडीटीव्ही नावाच्या एका वृत्तवाहिनीने केलाय.

या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार न्यूझीलंडचा संघ आठ दिवस इस्लामाबादमधील सेरेना हॉटेलमध्ये मुक्कामी होता. या ठिकाणी संघाच्या सुरक्षेसाठी कॅपीटल टेरेटरी पोलीस फोर्स तैनात करण्यात आलेली. या हॉटेलला सुरक्षा पुरवण्यासाठी ५०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले. या पोलिसांसाठी आठ दिवसाचा खाण्याचा खर्च हा तब्बल २७ लाख रुपये इतका आल्याचा दावा वृत्तवाहिनीन केलाय. सुरक्षेमध्ये तैनात असणारे हे पोलीस कर्मचारी दिवसातून दोन वेळा बिर्याणीचं जेवण करायचे अशी माहिती देण्यात आलीय.

सुरक्षारक्षकांच्या खाण्यासंदर्भातील बिल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या विभागाकडे आल्यानंतर या खर्चासंदर्भातील खुलासा झाला. तपासादरम्यान एवढ्या मोठ्या रक्कमेचं बील पाहून हे बील न देण्याचा तात्पुरता निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणाची आथा चौकशी सुरु आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंडच्या संघासाठी तैनात करण्यात आलेल्या जवानांच्या वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये फ्रंटियर कॉन्सटेब्युलरी दलातील जवानही होते. या जवानांसाठी वेगळं खाणं यायचं त्याचं बील वगळून हे २७ लाखांचं बील समोर आलं आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असून लवकरच याबद्दल अंतिम निर्णय घेतला जाणार असून एवढं बील कसं काय आलं याचा तपास सध्या यंत्रणा करत आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pcb reportedly receives biryani bill of rs 27 lakh from security officials hired for nz team scsg