पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेतून पाकिस्तानने माघार घेतल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) दंड ठोठावला जाऊ शकतो, अशी भीती पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान यांनी व्यक्त केली आहे. आयसीसीकडून पीसीबीला मोठा आर्थिक दंड होऊ शकतो, असे खान यांनी लोहारमध्ये प्रसारमाध्यमांना सांगितले.
‘‘मी नुकतीच पंतप्रधानांच्या सचिवालयाशी चर्चा केली आहे आणि अद्याप तरी पाकिस्तानच्या संघाला ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतात जाण्याची परवानगी देण्यात
आलेली नाही,’’ असे शहरयार खान म्हणाले.
‘‘जागतिक दर्जाच्या क्रिकेट स्पध्रेला संघ पाठवण्यासाठी आम्हाला सरकारच्या सल्ल्याची आणि परवानगीची आवश्यकता आहे. आम्ही परिस्थितीचा आढावा घेत असून लवकरच तुम्हाला निर्णय सांगू, असे पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे,’’ अशी माहिती खान यांनी दिली.
संघ पाठवण्यासाठी आयसीसीकडून आमच्यावर कोणतेही दडपण लादण्यात येत नाही. अंतिम निर्णय हा सर्वस्वी सरकारचा असेल, असे सोमवारी पीसीबीने स्पष्ट केले होते.

Story img Loader