ब्राझील : फुटबॉल विश्वात महान समजले जाणारे ब्राझीलचे फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. पेले हे तीन वेळा फिफा विश्वचषक जिंकणारे एकमेव खेळाडू होते.
पेले या नावाने प्रसिद्ध असलेले एडसन अरांतेस डो नासिमेंटो यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९४० रोजी ब्राझीलच्या मिनास गेराइस राज्यातील ट्रेस कोराकोस येथे झाला. १९५८ मध्ये ब्राझीलच्या पहिल्या फिफा विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच किशोरवयीन असलेल्या पेले यांनी फ्रान्सविरुद्धच्या उपांत्य फेरीत हॅट्ट्रिक केली होती.
पेले यांना कोलन कॅन्सर झाला होता. त्यांची किडनी व हृदय नीट कार्य करत नव्हतं. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. त्यांना रुग्णालयात डॉक्टरांच्या विशेष निगरानीत ठेवण्यात आलं होतं. अखेर त्यांची झुंज अयशस्वी ठरली आणि त्यांचे निधन झाले.
Pele: …आणि पेलेंना मैदानाबाहेर काढणारे पंच प्रेक्षकांच्या दबावामुळे स्वत:च मैदान सोडून निघून गेले!
पेले यांच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबीयांनी रात्री त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पेले यांचा फोटो शेअर करत दिली. प्रेम आणि प्रेरणा हीच पेले यांची खासियत होती,असं त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. महान फुटबॉलपटूच्या निधनाचे वृत्त समजताच जगभरातील क्रीडाप्रेमींवर शोककळा पसरली.