फिफा विश्वचषक स्पर्धेदरम्यान ब्राझीलमधील संतप्त निदर्शकांनी गोंधळ घातल्यास, परदेशातील चाहते ब्राझीलवारी रद्द करतील, अशी भीती ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांना वाटू लागली आहे.
‘‘येत्या काही आठवडय़ात निदर्शक पुन्हा एकदा रस्त्यावर उतरतील, यात शंका नाही. या चळवळीमुळे फिफा विश्वचषकासाठी ब्राझीलमध्ये येणाऱ्या २५ टक्के परदेशी चाहत्यांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे ते ब्राझीलला येणे टाळतील, अशी शक्यता अधिक आहे. तसे झाल्यास, देशाची ती अपरिमित हानी असेल,’’ असे फिफा विश्वचषक २०१४ स्पर्धेचे सदिच्छादूत असलेल्या पेले यांनी सांगितले.
पायाभूत सोयीसुविधा, शाळा आणि रुग्णालये यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी ब्राझीलमधील सरकार स्टेडियमच्या उभारणीवर अफाट पैसा खर्च करत असल्यामुळे यजमान देशातील चाहते सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. रस्त्यावर उतरण्याऐवजी फुटबॉलवर लक्ष केंद्रित करा, अशी विनंती गेल्या वर्षी ब्राझीलमधील चाहत्यांना करणाऱ्या पेले यांनी आता त्यांची बाजू घेतली आहे. ते म्हणाले, ‘‘शाळा आणि रुग्णालये हवेत, या निदर्शकांच्या मागणीविषयी मी सहमत आहे. मात्र भ्रष्टाचार आणि राजकारणाची झळ ब्राझील फुटबॉल संघाला बसता कामा नये. भ्रष्ट राजकारणी आणि लुटारूंविरोधात आपण काहीही करू शकत नाही. तो आपला दोष नाही.’’
स्पेनमध्ये जेतेपद राखण्याची गुणवत्ता नाही -फिगो
लंडन : गतविजेत्या स्पेन संघामध्ये जेतेपद राखण्याची गुणवत्ता नसल्यामुळे यजमान ब्राझील संघ सहाव्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे, असे भाकीत महान फुटबॉलपटू लुइस फिगो यांनी वर्तवले आहे. ‘‘स्पेन पुढील महिन्यात होणारी विश्वचषक स्पर्धा जिंकेल, असे मला वाटत नाही. त्यांच्यात तेवढी गुणवत्ता दिसत नाही. त्यामुळे त्यांना जेतेपद राखणे अशक्य आहे. ब्राझीलने चांगली सुरुवात केल्यास त्यांना रोखणे कठीण जाणार आहे. प्रशिक्षक लुइझ फिलिप स्कोलारी हे ब्राझीलला विश्वचषक जिंकून देतील, अशी आशा आहे. पोर्तुगाल या माझ्या देशालाही जेतेपद पटकावताना बरेच कष्ट घ्यावे लागणार आहेत. पोर्तुगाल संघ ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या कामगिरीवरच अधिक अवलंबून आहे,’’ असे एकेकाळचे दिग्गज फुटबॉलपटू आणि जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावणारे फिगो यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा