फुटबॉल हा श्वास असणाऱ्या ब्राझीलमध्ये फुटबॉलमधील सर्वोच्च स्थान काबीज करण्यासाठी विश्वचषकाचा महासंग्राम सुरू आहे. आपल्या अद्भुत खेळाने ब्राझीलला जगाच्या नकाशावर नेणारे महान फुटबॉलपटू पेले ब्राझीलचेच. त्यांच्या मायदेशात चालू असलेल्या फुटबॉलच्या कुंभमेळ्यात पेले कुठे तरी हरवल्याचे सहज लक्षात येते. फुटबॉलसम्राट असे बिरुद मिरवणाऱ्या पेले यांचाच विश्वचषक संयोजकांना विसर पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
साओ पावलो येथे झालेल्या विश्वचषकाच्या दिमाखदार उद्घाटन सोहळ्याला ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षा दिलमा रौसेफ स्वत: उपस्थित होत्या. या सोहळ्याला अन्य देशांचे प्रमुखही उपस्थित होते. मात्र साओ पावलोपासून नजीकच असलेल्या सँटोसमध्ये स्थायिक असलेले पेले मात्र या सोहळ्याला हजर नव्हते.
फोर्टालिझा येथे झालेल्या ब्राझीलच्या दुसऱ्या लढतीला उपस्थित राहण्याचा पेले यांचा प्रयत्न वाहतूक कोंडीमुळे अपयशी ठरला. गाडीतच अडकलेल्या पेले यांना आकाशवाणीच्या समालोचनावरच समाधान मानावे लागले. ‘‘१९५०मध्ये आणि आज अशा प्रकारे आयुष्यात दुसऱ्यांदा विश्वचषकातील ब्राझीलची लढत आकाशवाणीच्या समालोचनाच्या माध्यमातून ऐकली,’’ या शब्दांत पेले यांनी आपली खंत प्रकट केली.
ब्राझीलला महान खेळाडूंची परंपरा लाभली आहे, मात्र ७३ वर्षीय पेले यांचा सार्वकालीन महान खेळाडूंच्या मांदियाळीत समावेश होतो. विश्वचषकापूर्वी त्यांना ‘मानद सदिच्छादूत’ म्हणून घोषित करण्यात आले. जगभरातल्या पेले चाहत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले होते.
गेल्याच आठवडय़ात पेले यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या संग्रहालयाचे सँटोस येथे उद्घाटन झाले. आपल्या कर्तृत्वाचा वेध घेणारे हे संग्रहालय पाहताना पेले यांना अश्रू आवरले नव्हते. झळाळता विश्वचषक पेले यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूच्या हस्तेच विजयी संघाला प्रदान करणे इष्ट ठरले असते. मात्र तूर्तास तरी ब्राझीलची सुपरमॉडेल गिसले बुंडचेन या सौंदर्यवतीला हा मान देण्यात आला आहे. फुटबॉल विश्वातल्या या ज्येष्ठ खेळाडूची मायदेशात होणाऱ्या विश्वचषकाच्या वेळी अशी उपेक्षा व्हावी हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा