Brazil Football Player Pele Died at 82: पेले असे नाव आहे, ज्यांनी फुटबॉलचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. या महान खेळाडूने शुक्रवारी (३० डिसेंबर) जगाचा निरोप घेतला. २९ नोव्हेंबर रोजी त्यांना साओ पाउलो येथील अल्बर्ट आईनस्टाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पेले पोटाच्या कर्करोगाशी झुंज देत होते. ब्राझीलचे दिग्गज खेळाडू पेले यांच्या निधनाने भारतातही दु:खाचे वातावरण आहे. इथेही त्यांचे करोडो चाहते आहेत, जे त्याची एक झलक पाहण्यासाठी काहीही करायला तयार असायचे.
याचे कारण पेले यांचा भारताशीही खूप खास संबंध आहे. त्यांनी दोनदा भारताला भेट दिली आहे. एकदा पेले कोलकात्यात मोहन बागान विरुद्ध सामना खेळले होते. तसेच पेले दुसऱ्यांदा पश्चिम बंगालमध्ये आले होते, तेव्हा त्यांनी येथील दुर्गापूजेत भाग घेतला होता.
कोलकातामध्ये पेलेंनी खेळला होता रोमांचक सामना –
सर्वप्रथम, महान फुटबॉलपटू पेले यांनी १९७७ मध्ये भारतीय भूमीवर पाऊल ठेवले होते. त्यावेळी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर २४ सप्टेंबर १९७७ रोजी पेले मोहन बागानविरुद्ध सामना खेळले. तेव्हा पेले न्यूयॉर्क कॉसमॉस संघाकडून खेळत होते. प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या ईडन गार्डन्सच्या मैदानावर हा सामना खूपच रोमांचक झाला. तीन वेळा फिफा विश्वचषक विजेत्या पेलेने आपली जादू दाखवायला सुरुवात केलीच होती की मोहन बागानच्या खेळाडूंनी त्यांना घेरायला सुरुवात केली.
या संपूर्ण घडामोडीत मोहन बागानच्या खेळाडूंना यश मिळाले आणि त्यांनी पेलेंना गोल करू दिला नाही. एके काळी मोहन बागानने हा सामना २-१ असा जवळपास जिंकला होता, परंतु कॉसमॉस संघाने वादग्रस्त पेनल्टीवर गोल करत सामना २-२ असा बरोबरीत सोडवला.
हेही वाचा – विश्लेषण: पेले… फुटबॉलमधील अद्भुत दंतकथा!
या सामन्यात चार गोल केले होते –
कॉसमॉससाठी पहिला गोल कार्लोस अल्बर्टोने १७व्या मिनिटाला केला. यानंतर ही आघाडी फार काळ टिकली नाही आणि काही वेळातच श्याम थापाने गोल करत सामना बरोबरीत आणला. पहिला हाफ संपण्यापूर्वी अकबरने दुसरा गोल करत मोहन बागानला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. मात्र उत्तरार्धात चंगालियाने वादग्रस्त पेनल्टीवर गोल करत सामना बरोबरीत आणला. हा सामना कोलकाता मैदानाचे प्रसिद्ध फुटबॉल प्रशासक धीरेन डे यांच्या प्रयत्नांचे फलित होते, जे त्यावेळी मोहन बागानचे सरचिटणीस होते.
बॉलीवूडच्या एका चित्रपटातही त्यांचा उल्लेख होता –
तेव्हा भारतात पेलेंची क्रेझ इतकी होती की, चित्रपटांमध्येही त्यांचा उल्लेख व्हायचा. या सामन्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १९७९ मध्ये अमोल पालेकरचा ‘गोलमाल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यातही ही बाब नमूद करण्यात आली होती. चित्रपटात अमोल पालेकर जेव्हा उत्पल दत्तला नोकरीसाठी मुलाखत देतो, तेव्हा तो ‘ब्लॅक पर्ल’ बद्दल म्हणतो, ‘ऐकले आहे की कलकत्ता (कोलकाता) मध्ये सुमारे ३०-४० हजार वेडे मध्यरात्री डम डम विमानतळावर दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते.
सात वर्षांपूर्वीही पेले भारतात आले होते –
१९७७ मध्ये झालेल्या या सामन्यानंतर पेले ऑक्टोबर २०१५ मध्ये पुन्हा एकदा भारत दौऱ्यावर आले होते. यादरम्यान ते सुमारे आठवडाभरासाठी आले होते. यादरम्यान पेले पश्चिम बंगालच्या दुर्गापूजेतही सहभागी झाले होते. यासोबतच इंडियन सुपर लीग ही फुटबॉल स्पर्धाही याच काळात आयोजित करण्यात आली होती. त्यादरम्यान पेलेंनी काही सामनेही पाहिले होते. त्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीनेही पेले यांची भेट घेतली.
गांगुली एका कार्यक्रमात पेलेंबद्दल म्हणाला होता, ‘मी तीन विश्वचषक खेळलो आहे. विजेता आणि उपविजेता होण्यात फरक आहे. तीन विश्वचषक आणि गोल्डन बूट जिंकणे ही मोठी गोष्ट आहे. पेले म्हणाले, ‘मी भारतात येण्याचे आमंत्रण स्वीकारले, कारण मला येथील लोक खूप आवडतात’. त्याचबरोबर ते पुढे म्हणाले, ‘मला कोणत्याही प्रकारे मदत झाली तर मी पुन्हा येईन.’