Brazil Football Player Pele Died at 82: ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचे गुरुवारी वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. त्यांची मुलगी केली नॅसिमेंटोने सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. पेले पोटाच्या कर्करोगाशी झुंज देत होते. 29 नोव्हेंबर रोजी त्यांना साओ पाउलो येथील अल्बर्ट आईनस्टाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यांच्यावर केमोथेरपीद्वारे उपचार करण्यात आले, मात्र त्याचा काहीच फायदा होत नव्हता. यानंतर केमोथेरपी बंद करून त्यांना वेदना कमी करण्यासाठी औषधे देण्यात आली. त्यांना किडनी आणि हृदयविकाराचा त्रासही होता.पेले गरिबीत मोठे झाले होते, त्यांचे वडील सफाई कामगार होते. त्यांनी ब्राझीलच्या साओ पाउलोच्या रस्त्यांवर फुटबॉल खेळायला सुरुवात केली होती. आर्थिक विवंचनेमुळे त्यांनी चहाच्या टपरीवरही काम केले होते.
बिले पासून बनले पेले –
पेलेंचा जन्म झाला तेव्हा त्यांचे नाव एडिसन ठेवण्यात आले. त्यांचे कुटुंबीयही त्यांना प्रेमाने डिको म्हणत. त्यांना लहानपणापासूनच फुटबॉलची आवड होती. त्यांचे वडील मोठ्या ब्राझिलियन क्लब फ्लुमिनेन्ससाठी खेळले होते, परंतु पैशांच्या कमतरतेमुळे त्यांना क्लिनर बनावे लागले. पेलेंना त्याच्या क्षेत्रातील स्थानिक क्लब वास्को द गामाचा गोलकीपर बिले खूप आवडत होता. तो शाळेत फुटबॉल खेळायचे, तेव्हा त्यांचे मित्र त्यांना पेले म्हणू लागले. तेव्हापासून त्याचे नाव पेले ठेवण्यात आले.
सॉक्समध्ये वर्तमानपत्र भरून फुटबॉल खेळायचे –
पेले त्यांच्या गल्लीत मित्रांसोबत फुटबॉल खेळत असे. गरिबीत वाढल्यामुळे त्याच्याकडे फुटबॉल विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. या कारणास्तव ते उघड्या पायाने वृत्तपत्र सॉक्समध्ये भरून आणि दोरीने बांधून खेळत असे.
लहान वयातच स्थानिक क्लबसाठी खेळायला सुरुवात केली –
वयाच्या १२-१३ व्या वर्षी, पेलेंनी त्यांच्या मूळ गावी बौरू येथील स्थानिक क्लब रेडियम फुटबॉल संघाकडून खेळण्यास सुरुवात केली. त्यांच्या शहरात प्रथमच फुटसल म्हणजेच ५-५ खेळाडूंमध्ये इनडोअर स्पर्धा झाली. त्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन विजेतेपद पटकावले. याशिवाय एका स्पर्धेच्या आयोजन समितीने तो अल्पवयीन असल्याचे सांगून त्याला सहभागी होऊ दिले नाही. तरीही स्पर्धा खेळले आणि त्यातही त्यांनी सर्वाधिक गोल केले. येथून त्याचे चित्र बदलले.
वयाच्या १७ व्या वर्षी ब्राझील संघातून आले होते बोलावणे –
लीगमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे, क्लबमध्ये सामील झाल्यानंतर अवघ्या १० महिन्यांनंतर त्यांना ब्राझील राष्ट्रीय फुटबॉल संघाकडून बोलावने आले. पेले १९५८ मध्ये विश्वचषक खेळले आणि तोही जिंकला. फ्रान्सविरुद्धच्या उपांत्य फेरीत त्यांनी हॅट्ट्रिक केली होती. जो आजही एक विक्रम आहे. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी पेलेंनी आपल्या देशाला विश्वचषक ट्रॉफी जिकून दिली. विश्वचषक स्पर्धेत गोल करणाऱ्या सर्वात तरुण खेळाडूंमध्ये त्यांचे नाव अजूनही आघाडीवर आहे.
ब्राझील फुटबॉलपटू पेले यांचा जीवनप्रवास पाहायचा आहे का? नेटफ्लिक्सवरील ‘हा’ बायोपिक नक्की पाहा
१९५८ नंतर आणखी २ विश्वचषक जिंकले –
पेलेंनी आपल्या कारकिर्दीत ४ विश्वचषक खेळले. यापैकी ३ जिंकले. पहिला विश्वचषक स्वीडन (१९५८ ), दुसरा चिली (१९६२) आणि तिसरा मेक्सिको (१९७०) मध्ये जिंकला होता. त्यांना १९६६ चा विश्वचषक जिंकता आला नाही. त्यादरम्यान इंग्लंडने ट्रॉफी जिंकली.
१९५६ ते १९७४ पर्यंत सँटोसकडून खेळले-
पेले १९५६ ते १९७४ पर्यंत ब्राझीलच्या सर्वोच्च क्लब सँटोससाठी खेळले. त्यांनी सँटोससाठी ६५६ सामन्यांमध्ये ६४३ गोल केले. त्याचबरोबर क्लबमध्ये असताना २१ ट्रॉफीही त्यांच्या नावावर होत्या. ब्राझीलमध्येही त्यांची कारकीर्द गाजली. त्यांनी ९२ सामने खेळले आणि ७८ गोल केले. पेलेंनी १९७१ मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली. १९७१ नंतर ते क्लब फुटबॉल खेळत राहिले.
१९७७ मध्ये फुटबॉलमधून निवृत्ती घेतली –
सँटोसकडून खेळल्यानंतर पेलेंनी शेवटची काही वर्षे अमेरिकेत घालवली. ते न्यूयॉर्कच्या न्यू यॉर्क कॉसमॉस संघाकडून खेळत असे. अमेरिकेत त्यांनी ६४ सामने खेळले आणि ३७ गोल केले. यानंतर वयाच्या ३६ व्या वर्षी निवृत्ती घेऊन फुटबॉलला अलविदा केला.
Pele Passes Away: पेलेंनी खरोखरच युद्ध थांबवले होते का? जाणून घ्या काय घडलं होतं ५३ वर्षांपूर्वी
पेले हे ब्राझीलचे क्रीडा मंत्री राहिले आहेत –
१९५५ मध्ये ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी पेले यांना क्रीडा मंत्री केले, जेणेकरून फुटबॉलमधील भ्रष्टाचार संपेल. यानंतर पेलेंचा कायदाही त्यांच्या नावावर झाला. यामध्ये सर्व व्यावसायिक फुटबॉल क्लबना दोन वर्षांच्या आत सरकारला कर द्यावा लागत होता.
पेलेंचा वाद –
पेले यांच्या नावाशीही वाद आहे. २००१मध्ये, पेले यांच्यावर युनिसेफकडून $७ दशलक्षच्या चोरीच्या भ्रष्टाचार घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप होता. सामना रद्द झाल्यानंतरही पेलेने हा नफा त्यांच्या कंपनीला दिला आणि तो परत केला नाही, असा दावा करण्यात आला. मात्र, या प्रकरणात त्यांच्यावरील एकही आरोप सिद्ध झाला नाही. युनिसेफनेही नंतर आपला दावा मागे घेतला.
विश्लेषण: पेले… फुटबॉलमधील अद्भुत दंतकथा!
पेलेंनी कधीही बॅलन डी’ओर जिंकला नाही –
बॅलन डी’ओर हा जागतिक फुटबॉलमधील सर्वात मोठा वैयक्तिक पुरस्कार मानला जातो. तो वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडूला दिला जातो. पेलेंची कामगिरी चांगली असूनही, त्यांना कधीही बॅलन डी’ओर मिळाला नाही. याचे कारण म्हणजे १९९१ पूर्वी हा पुरस्कार फक्त युरोपातील खेळाडूंनाच दिला जात होता. त्यामुळेच ब्राझीलचे पेले आणि अर्जेंटिनाचा मॅराडोना यांना हा पुरस्कार कधीच मिळू शकला नाही.