साओ पावलो : तीन विश्वचषक विजेते आणि फुटबॉलपटूमधील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असलेल्या पेले यांना मागे टाकून नेयमार ब्राझीलसाठी सर्वाधिक गोल झळकावणारा खेळाडू बनला आहे. बोलिव्हियाविरुद्ध विश्वचषक पात्रता सामन्यातील नेयमारने दोन गोल नोंदवले. यापैकी पहिल्या गोलसह नेयमारने ब्राझीलकडून सर्वाधिक गोलचा विक्रम आपल्या नावे केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बेलेम येथे झालेल्या या सामन्यात ३१ वर्षीय नेयमारने आपला पहिला गोल ६१व्या मिनिटाला गोल झळकावला. हा त्याचा आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील ७८वा गोल होता. यामुळे त्याने पेले यांच्या ७७ गोलचा विक्रम मोडीत काढला. ब्राझीलने या विश्वचषक पात्रता सामन्यात ५-१ असा विजय नोंदवला. नेयमारने या सामन्यात संघासाठी चौथा व पाचवा गोल झळकावला. आता त्याचे एकूण ७९ गोल झाले आहेत.

क्लब फुटबॉलमध्ये आता सौदी अरेबियातील अल-हिलालचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेयमारला बोलिव्हियाविरुद्ध १७व्या मिनिटाला पेनल्टीच्या साहाय्याने गोल करण्याची संधी होती. मात्र, तो चेंडू गोलजाळय़ात मारण्यापासून चुकला. मात्र, उत्तरार्धात त्याने दोन गोल नोंदवले. नेयमारने या विक्रमी कामगिरीनंतर मैदानात आनंदही साजरा केला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पेले यांचे निधन झाले होते. त्यांनी ब्राझीलकडून खेळताना ९२ सामन्यांत ७७ गोल झळकावले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pele record is broken by neymar football world ysh