फुटबॉलमधील एक हजार गोलांचा सम्राट म्हणून ख्याती असलेले एडसन अरान्तेस दो नाशिमेन्टो म्हणजेच फुटबॉल विश्वाचे लाडके पेले हे ऑक्टोबरमध्ये भारताला भेट देणार आहेत. ३८ वर्षांनी त्यांना पाहण्याची संधी भारतीयांना मिळणार आहे.
सुब्रतो चषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना ऑक्टोबरमध्ये आयोजित केला जाणार आहे. या सामन्याला विशेष अतिथी म्हणून पेले यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या सामन्याला उपस्थित राहण्यास पेले यांनी मान्यता दिली आहे. यापूर्वी १९७७ मध्ये मोहन बागान संघाविरुद्धच्या प्रदर्शनीय सामन्यात न्यूयॉर्क कॉसमॉस संघाकडून त्यांनी भाग घेतला होता.
सुब्रतो चषक स्पर्धेला उपस्थित राहण्यास मान्यता देताना पेले म्हणाले की, ‘‘भारतात फुटबॉलची लोकप्रियता वाढली आहे. सुब्रतो स्पर्धा आयोजित करण्यासाठी भारतीय हवाई दलाने खूप मेहनत घेतली आहे. त्यांनी अनेक युवा खेळाडूंना एकत्र आणण्यात यश मिळविले आहे. माझी भारत भेट युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायक ठरेल अशी मला खात्री आहे.’’
‘‘भारत हा माझा आवडता देश असून तेथे पुन्हा भेट देण्यासाठी मी उत्सुक झालो आहे. खूप वर्षांपूर्वी मी तेथे गेलो होतो. त्यानंतर बरीच वर्षे झाली असली तरी माझ्यासाठी त्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत,’’ असेही पेले यांनी सांगितले.
इंडियन सुपर लीग स्पर्धेतील अ‍ॅटेलटिको कोलकाता संघाच्या सलामीच्या लढतीसही ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांनी कोलकाता येथे या संदर्भात आयोजित केलेल्या समारंभाला ते उपस्थित राहणार असल्याचे समजते.
पेले यांनी ब्राझील संघाकडून तीन वेळा विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला असून, कारकिर्दीत त्यांनी एक हजार २८३ गोल नोंदविले आहेत. १९९९ मध्ये त्यांना शतकातील सवरेत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून गौरविण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनेही शतकातील सर्वोत्तम प्रभावी खेळाडू म्हणून त्यांची निवड केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा