हॉकीतील वाढत्या आव्हानाला यशस्वीरीत्या सामोरे जायचे असेल तर पेनल्टी कॉर्नरच्या दुबळेपणावर मात करण्याची आवश्यकता आहे. पेनल्टी कॉर्नर हा खेळाचा आत्माच आहे, मात्र बऱ्याच वेळा आपल्या संघातील खेळाडूंना त्याची जाणीव दिसून येत नाही. ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी त्याचे तंत्र आत्मसात करण्याची गरज आहे, असे माजी ऑलिम्पिक हॉकीपटू जफर इक्बाल यांनी सांगितले. भारतीय संघाने बेल्जियममध्ये नुकत्याच झालेल्या जागतिक हॉकी लीगमध्ये कांस्यपदकाची संधी गमावली. भारतीय संघाने पुरुषांच्या गटात यापूर्वीच रिओ ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित केले आहे. महिलांमध्ये भारताने लीगमध्ये पाचवे स्थान मिळवीत ऑलिम्पिकच्या आशा कायम राखल्या आहेत. या दोन्ही संघांच्या कामगिरीबाबत तसेच आगामी ऑलिम्पिकबाबत इक्बाल यांनी केलेली खास बातचीत –
ल्ल जागतिक हॉकी लीगमधील भारतीय संघाच्या कामगिरीबाबत काय सांगता येईल?
आपले खेळाडू ऑलिम्पिकमधील अव्वल यशापासून खूपच दूर आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे. या लीगमध्ये आपल्याला ऑस्ट्रेलिया, बेल्जियम व इंग्लंड या तीनच तुल्यबळ संघांचे आव्हान होते. ऑलिम्पिकमध्ये जर्मनी, नेदरलँड्स, स्पेन आदी देशांचे आणखी आव्हान असणार आहे हे लक्षात घेता उपांत्य फेरीत स्थान मिळविण्यासाठीही भारतीय पुरुष संघाला पूर्ण ताकदीनिशी खेळावे लागणार आहे. तेथे साखळी गटात किमान तीन तुल्यबळ संघांबरोबर आपल्याला झुंज द्यावी लागेल. साखळी गटातून बाद फेरीत कसे स्थान मिळविता येईल याचा आतापासूनच विचार केला पाहिजे.
ल्ल पेनल्टी कॉर्नरचे भारतीय खेळाडू दडपण घेतात का?
होय, आशियाई क्रीडा स्पर्धेत जरी आपण सोनेरी यश मिळविले असले तरीही पेनल्टी कॉर्नरबाबत अद्यापही आपले खेळाडू कमकुवत आहेत. मुळातच केवळ एक-दोन खेळाडूंवर ही जबाबदारी टाकणे चुकीचे ठरेल. संघातील प्रत्येक खेळाडूने या कॉर्नरद्वारा गोल कसा करता येईल हे तंत्रज्ञान शिकले पाहिजे. जागतिक लीगमध्ये ऑस्ट्रेलिया, बेल्जियम व इंग्लंडचे खेळाडू पेनल्टी कॉर्नरचा कसा चांगल्या रीतीने उपयोग करीत होते, याचे त्यांनी पुन्हा निरीक्षण केले पाहिजे. जेव्हा एखादा खेळाडू पेनल्टी कॉर्नरचा फटका मारत असतो, त्या वेळी त्याच्या सहकाऱ्यांनी चपळाईने गोलपोस्टपर्यंत धडक मारली पाहिजे. जागतिक लीगमध्ये जसजित सिंगने चांगली कामगिरी केली होती. त्याने हे तंत्र अधिकाधिक आत्मसात केले पाहिजे. गोलरक्षकाच्या खांद्याजवळून किंवा थोडासा बाजूला चेंडू मारला तर त्याला हा चेंडू रोखणे कठीण जाते हे तंत्र गोल करताना उपयोगात आणले पाहिजे.
ल्ल अनेक युवा खेळाडूंच्या समावेशामुळे लीगमध्ये भारत कांस्यपदक मिळवू शकला नाही, असे तुम्हास वाटते काय?
हे कारण मला पटणारे नाही. कारण जरी युवा खेळाडू आपल्या संघात होते, तरीही गोल करण्याच्या अनेक हुकमी संधी त्यांनी वाया घालविल्या. खेळाडू युवा गटातील किंवा अन्य कोणत्याही वयाचा असो, अशा संधींवर गोल केलाच पाहिजे. गोल करण्याच्या संधी सहजासहजी मिळत नाहीत. त्या मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. त्यामुळेच अशा प्रत्येक संधीवर गोल करणे अनिवार्य असते. अन्य संघांमध्ये अनेक युवा खेळाडू होते. ते जर यशस्वी कामगिरी करू शकतात तर आपण का करू शकत नाही याचा विचार युवा खेळाडूंनी केला पाहिजे. पेनल्टी कॉर्नरप्रमाणेच मैदानी गोलवरदेखील भर दिला पाहिजे. ऑलिम्पिकसाठी अद्याप एक वर्ष बाकी आहे. सराव शिबिर व स्पर्धामधील सहभाग याची योग्य रीतीने सांगड घालण्याची गरज आहे.
ल्ल गोलरक्षकाच्या कामगिरीबाबत तुम्ही समाधानी आहात काय?
गोलरक्षक हा संघाचा मोठा आधारस्तंभ असतो. संघाचे यशापयश त्याच्यावर अवलंबून असते. पी.आर. श्रीजेशने जागतिक हॉकी लीगमध्ये समाधानकारक कामगिरी केली, मात्र त्याच्याकडून मला खूप मोठय़ा आशा होत्या. भारताने जे गोल स्वीकारले त्यापैकी पाच ते सात गोल तो सहज वाचवू शकला असता. दोन पायांमध्ये अंतर ठेवल्यास प्रतिस्पर्धी खेळाडू त्याचा फायदा घेतात. त्याच्या कामगिरीत अधिक सफाईदारपणा व चापल्याची आवश्यकता आहे. त्याने ऑलिम्पिकसाठी तयारी करताना ऑस्ट्रेलिया व अन्य बलाढय़ देशांचे गोलरक्षक कसे गोल वाचवितात याचा अभ्यास केला पाहिजे.
ल्ल महिला संघाविषयी तुमचे काय मत आहे?
भारतीय संघ ऑलिम्पिकच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचला आहे. १९८० नंतर भारतीय संघाला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवता आलेले नाही. रिओ येथील स्पर्धेसाठी त्यांना प्रवेश मिळाला पाहिजे अशी माझी मनोमन इच्छा आहे. त्यांच्या कामगिरीत सुधारणा होत आहे. मात्र ऑलिम्पिकचा विचार करता त्यांना खूप लांबचा पल्ला गाठावयाचा आहे. पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल, सांघिक कौशल्य, बचावफळी याबाबत त्यांनी खूप मेहनत केली पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा