आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या मुख्य प्रायोजकत्वाच्या शर्यतीत पेप्सीची भारती एअरटेलवर मात केली आहे. २०१३ पासून सुरू होणाऱ्या आगामी पाच वर्षांकरिता त्यांनी ३९६ कोटी ८० लाख रुपयांची बोली जिंकली.
यापूर्वी डीएलएफने पहिली पाच वर्षे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजकत्व स्वीकारले होते. त्यांनी पुढील पाच वर्षांकरिता पुन्हा बोली लावण्यात स्वारस्य दाखविले नाही. त्यामुळे नव्याने निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पेप्सीने ३९६ कोटी ८० लाख रुपये तर एअरटेलने ३१६ कोटी रुपयांची बोली लावली होती. डीएलएफने पहिल्या पाच वर्षांकरिता दोनशे कोटी रुपयांचे प्रायोजकत्व केले होते.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या विपणन विभागाचे प्रमुख फारूख अब्दुल्ला यांनी येथे ही घोषणा केली. या वेळी आयपीएलच्या नियामक समितीचे अध्यक्ष राजीव शुक्ला हेही उपस्थित होते. शुक्ला यांनी सांगितले, आतापर्यंत आयपीएल स्पर्धेच्या विविध हक्कांच्या विक्रीकरिता चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पेप्सीको समूह हा शीतपेय उत्पादन क्षेत्रातील अतिशय नावाजलेला समूह आहे. पुन्हा भारतीय क्रिकेट क्षेत्रातील त्यांचा सहभाग सर्वासाठी उत्साहवर्धक ठरणार आहे.

Story img Loader