मी चाळीस वर्षांचा आहे. या गोष्टीकडे मला दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे आयपीएलमधून निवृत्तीची हीच अचूक वेळ असल्याचे सचिन तेंडुलकरने सांगितले.  सहावा हंगाम माझा शेवटचा होता. सर्वोत्तम कामगिरीसह आम्ही जेतेपद पटकावले. त्यामुळे शेवट गोड झाला आहे, असेही त्याने पुढे सांगितले.
विश्वचषकासाठी मला २१ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. आयपीएल जेतेपदासाठी मला ६ वर्षे वाट पाहावी लागली. त्यामुळे जेतेपदासाठी उशीर झाला असे मी कधीच म्हणणार नाही. हे माझे शेवटचे आयपीएल होते. अलविदा करण्याची ही योग्य वेळ आहे. मुंबई इंडियन्स संघासोबत ६ वर्षांचा अनुभव आनंददायी होता. अथक परिश्रमानंतर आमचे जेतेपदाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले आहे. आयपीएलचा तिसरा हंगाम आमच्या संघासाठी सर्वोत्तम होता. पण या हंगामात जेतेपदाची कमाई झाल्याने सहाव्या हंगामाचे महत्त्व अनोखे आहे. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा या जेतेपदात मोठा वाटा आहे. क्रिकेटचा खेळ विजयी झाला आहे. आम्ही संपूर्ण हंगामात शानदार खेळ केला आणि म्हणूनच जेतेपद मिळवू शकलो, असे सचिचने सांगितले.
आयपीएलमधून निवृत्ती घेणाऱ्या सचिनने ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेत खेळणार का, याविषयी काहीही सांगितले नाही.  सचिनने आयपीएलच्या ७८ सामन्यांत मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले असून, ३४.८३च्या सरासरीने २३३४ धावा केल्या आहेत. यंदाच्या हंगामात सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत डाव्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे सचिनला शेवटच्या टप्प्यांतील लढतीत खेळता आले नव्हते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा