कुमामोतो (जपान): भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय, अनुभवी किदम्बी श्रीकांत आणि युवा लक्ष्य सेन यांच्या कामगिरीकडे मंगळवारपासून सुरू होणाऱ्या जपान मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत (सुपर ५०० दर्जा) लक्ष राहील.
प्रणॉयने पाठीच्या दुखापतीमुळे डेन्मार्क आणि फ्रेंच खुल्या स्पर्धेतून माघार घेतली. हांगझो येथे गेल्या महिन्यात पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान ऐतिहासिक कांस्यपदक जिंकणाऱ्या प्रणॉयला दुखापतीमुळे अडचणींचा सामना करावा लागला. चार आठवडय़ांनंतर पुनरागमन करणाऱ्या प्रणॉयचा सामना पहिल्या फेरीत बिगरमानांकित हाँगकाँगच्या ली चियुक युइशी होईल. प्रणॉयने आगेकूच केल्यास उपांत्यपूर्व फेरीत त्याच्यासमोर अँटनी सिनिसुका गिंटिंगचे आव्हान असेल. स्पर्धेत लक्ष्य व श्रीकांत यांना रँकिंग गुण मिळवण्याची संधी आहे. कारण ऑलिम्पिक पात्रतेला १ मेपासून सुरुवात होणार असून पुढील वर्षी २८ एप्रिलपर्यंत ती सुरू राहणार आहे. जगातील आघाडीचे १६ खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवतील.
जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेला प्रणॉय ऑलिम्पिक पात्रता निकषामध्ये आहे. तर सेन १७व्या आणि श्रीकांत २३व्या स्थानी आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील विजेता सेन जुलैमध्ये कॅनडा खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्यानंतर खराब लयीत आहे. गेल्या चार स्पर्धामध्ये तो पहिल्या फेरीतच गारद झाला. त्याचा सामना पहिल्या फेरीत तिसऱ्या मानांकित कोडाइ नाराओकाशी होईल. श्रीकांत पहिल्या फेरीत पात्रता फेरीतून आगेकूच करणाऱ्या खेळाडूचा सामना करेल. प्रियांशु राजावतचा सामना चायनीज तैपेइच्या लिन चुन यिशी होईल. दोन ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूचा सामना महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्टशी होईल. भारताच्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला पुरुष दुहेरीत अग्रमानांकन मिळाले आहे. त्यांचा सामना चायनीज तैपेइच्या इलु चिंग याओ व यांग पो हानशी होईल.