Avesh Khan: रणजी ट्रॉफीच्या या मोसमात वेगवान गोलंदाज आवेश खानने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. मध्य प्रदेशकडून खेळणाऱ्या आवेशने आंध्रविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात संघाच्या ५ गडी राखून विजय मिळवण्यात मोलाची भूमिका बजावली. पहिल्या डावात मध्य प्रदेशचा संघ आंध्रच्या धावसंख्येपेक्षा १५१ धावांनी मागे होता. यानंतर आंध्रच्या दुसऱ्या डावात आवेशने ४ बळी घेतल्या, त्यामुळे आंध्रचा संघ केवळ ९३ धावांवर गडगडला. आवेशने या रणजी मोसमात आतापर्यंत ७ सामन्यात ३६ बळी घेतले आहेत.
आपल्या शानदार कामगिरीबद्दल आवेश खानने सामन्यानंतर सांगितले की, “तिसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान आमचे खूप मोठे सत्र होते. पंडित सरांनी स्पष्ट केले की जर आम्हाला चॅम्पियन संघाप्रमाणे खेळायचे असेल तर आम्हाला विरोधी संघाला पराभूत करणे आवश्यक आहे. कमीतकमी १०० धावांच्या आता त्यांना रोखणे आवश्यक आहे. जेणेकरून आम्हाला केवळ २५० पर्यंतच्या धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करावा आहे. आम्ही ठरवलेल्या योजनेत विरोधी संघ अडकला आणि आम्ही यशस्वी झालो याचा आम्हाला खूप आनंद आहे.”
भारतीय संघात पुनरागमन करण्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर आवेश खान म्हणाला की, “मी दोनदा संघात आलो आणि संघाबाहेर गेलो आहे. लोकांचा असा अंदाज आहे की मी चांगली कामगिरी करत नव्हतो, कारण काही प्रसंगी मी धावा देण्याच्या बाबतीत खूप महाग ठरलो. पण आजच्या क्रिकेटमध्ये १० पैकी ६ वेळा गोलंदाजाला वाईट दिवस येऊ शकतात. याबाबत माझी कोणतीही तक्रार नाही पण हे सत्य आहे. आता मी या सर्व गोष्टी मागे सोडून वर्तमानात जगण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा जेव्हा निवड होईल, त्यावेळी ते होईल, कारण निवड नाही तर चांगली कामगिरी करणं माझ्या हातात आहे आणि म्हणूनच मी या सर्व गोष्टींचा विचार करणे सोडून दिले आहे.”
मला भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळायचे आहे
आवेश खानने आत्तापर्यंत भारतासाठी त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ टी२० आणि ५ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या दोन्ही फॉरमॅटमध्ये एकूण १६ गडी बाद केले आहेत. रणजीच्या या मोसमातील चमकदार कामगिरीनंतर आवेश म्हणाला की, “भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्याचे माझे ध्येय आहे.”
आवेश पुढे म्हणाला की, “मी भारतासाठी मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळलो आहे, आता भारतीय कसोटी संघात माझे स्थान पक्के करणे हे माझे ध्येय आहे आणि त्यासाठी मी सतत मेहनत घेत आहे. मला मध्य प्रदेशसाठी रणजी खेळून माझी जबाबदारी पार पाडायची आहे जेणेकरून मी संघाला पुढे नेऊ शकेन आणि आंध्रविरुद्धचा हा विजय संपूर्ण संघाची मेहनत आहे.”