काही महान खेळाडूंवर भाष्य करायचे, याच्यापेक्षा हा सरस वाटतो, असे बोलून वादंग निर्माण करायचा आणि फुकटात प्रसिद्धी मिळवायची, ही शक्कल अजूनही जुनी झालेली दिसत नाही आणि याचाच प्रत्यय पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याच्या वक्तव्याने येतो. सचिन तेंडुलकर आणि रिकी पॉन्टिंग यांच्यापेक्षा ब्रायन लाराच सरस असल्याचे मत आफ्रिदीने व्यक्त केले आहे.
‘‘ आतापर्यंतच्या १६ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये पाहिलेला सर्वोत्तम फलंदाज हा लारा आहे. माझ्या मते सचिन आणि पॉन्टिंगपेक्षा त्याचा वरचा दर्जा आहे,’’ असे आफ्रिदी म्हणाला.
तो पुढे म्हणाला की, क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये लाराला गोलंदाजी करणे हे सर्वात कठीण काम होते. जेव्हा त्याच्या मनात असेल तेव्हा चौकार मारण्याची क्षमता त्याच्यामध्ये होती. खासकरून फिरकी गोलंदाजीवर बेमालूमपणे तो चौकार खेचायचा. त्याची फलंदाजी पाहणे ही एक मेजवानी असायची.
लारा हा डोळे बंद करूनही फिरकीपटूंचा समाचार घेऊ शकत होता, असे सांगतानाच आफ्रिदी पुढे म्हणाला की, फिरकी गोलंदाजीवर डोळे बंद करूनही फटके मारण्याची कुवत त्याच्यामध्ये होती. सचिन आणि पॉन्टिंग हे महान फलंदाज आहेत, पण या दोघांपेक्षा लाराचा दर्जा हा नक्कीच वरचा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा