पावलो ग्युरेरोच्या शानदार हॅट्ट्रिकच्या जोरावर पेरूने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत बोलिव्हियावर ३-१ असा विजय मिळवला. या विजयासह पेरूने उपांत्य फेरीत स्थान पटकावले. उपांत्य फेरीत त्यांचा मुकाबला कट्टर प्रतिस्पर्धी चिलीशी होणार आहे.
ग्युरेरो गेली तीन वर्षे ब्राझीलमधील फ्लॅमेन्गो क्लबतर्फे खेळत आहे. त्याआधी जर्मनीत बायर्न म्युनिकसारख्या अव्वल संघाचे त्याने प्रतिनिधित्व केले होते. आपल्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग करत ग्युरेरोने २०व्या आणि २३व्या मिनिटाला दिमाखदार गोल केले. दोन गोलमुळे पेरूने भक्कम आघाडी घेतली. मध्यंतरानंतर ७४व्या मिनिटाला बोलिव्हियाच्या बचावपटूंना भेदत ग्युरेरोने हॅट्ट्रिक पूर्ण केली. बोलिव्हियातर्फे मार्केलो मार्टिन्सने पेनल्टीच्या माध्यमातून एकमेव गोल केला.
बोलिव्हियाने स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्यांमध्ये नैपुण्याची झलक दाखवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र पेरूच्या व्यावसायिक डावपेचांपुढे ते निष्प्रभ ठरले. या विजयासह पेरू आणि चिली या सख्ख्या शेजाऱ्यांमध्ये उपांत्य फेरीचा मुकाबला रंगणार आहे. १९३५पासून या दोन संघांमध्ये रंगणारे द्वंद्व ‘क्लासिको डेल पॅसिफिको’ या नावाने ओळखले जाते. या मुकाबल्याला दोन देशांदरम्यानच्या सागरी हद्दीवरून सुरू असलेल्या वादाची किनारही आहे.

Story img Loader