हिंगिससह वर्षांतील तिसरे ग्रॅण्ड स्लॅम
भारताचा ४२ वर्षीय टेनिसपटू लिएण्डर पेसने अमेरिकन खुल्या टेनिस स्पध्रेत मिश्र दुहेरीचा किताब पटकावून इतिहास घडवला. पेसने स्वित्र्झलडची नावाजलेली टेनिसपटू मार्टिन हिंगिससह जेतेपदाला गवसणी घालून चालू वर्षांत सर्वात यशस्वी खेळाडूचा मानही मिळवला. चौथ्या मानांकित पेस-हिंगिस जोडीने अमेरिकेच्या बेथानी मॅटीक-सॅण्ड्स आणि सॅम क्वुरी यांच्यावर ६-४, ३-६, १०-७ असा विजय मिळवला. पेस-हिंगिस जोडीचे हे या वर्षांतील तिसरे प्रमुख स्पध्रेतील जेतेपद आहे. याआधी या जोडीने ऑस्ट्रेलियन आणि विम्बल्डन ग्रॅण्ड स्लॅममध्ये बाजी मारली होती. या तिहेरी धमाक्यामुळे १९६९ नंतर एका सत्रात मिश्र दुहेरीचे तीन ग्रॅण्ड स्लॅम नावावर करणारी ही पहिलीच जोडी ठरली आहे.पेसचे हे मिश्र दुहेरीचे नववे जेतेपद असून त्याने भारताच्या महेश भूपतीच्या (८) विक्रमाला मागे टाकले.
मिश्र दुहेरीत सर्वाधिक दहा जेतेपद नावावर असलेल्या मार्टिना नवरातिलोव्हाचा विक्रम पेसला आता खुणावत आहे. या दहा जेतेपदांत पेससह नवरातिलाव्हाने २००३ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि विम्बलडन स्पध्रेतील जेतेपद पटकावली आहेत. मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात पेस-हिंगिस जोडीने सुरुवातीपासून प्रहार करताना पहिल्या सेटमध्ये २-१ अशी आघाडी घेतली. हिंगिसने जबरदस्त फोरहॅण्ड लगावात ब्रेकपॉइंट मिळवला. ५-४ अशा आघाडीवर असताना हिंगिसने व्हॉली विनर लगावून पहिला सेट नावावर केला. दुसऱ्या सेटमध्ये अमेरिकन जोडीने ३-१ अशी आघाडी घेत पेस-हिंगिसवर दडपण निर्माण केले. त्यातही पेस-हिंगिसने शानदार खेळ केला, परंतु या वेळी त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले आणि अमेरिकन जोडीने दुसऱ्या सेटसह सामना १-१ असा बरोबरीत आणला. टायब्रेकरमध्ये रंगलेल्या सेटमध्ये बिगरमानांकित अमेरिकन जोडीने ४-१ अशी आघाडी घेतली, परंतु पेस-हिंगिसने चुरशीचा खेळ करून ७-७ अशी बरोबरी मिळवली. या बरोबरीनंतर पेस-हिंगिसने बाजी मारून कोर्टवर जल्लोष केला. एकूण १७ ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद पेसच्या, तर १९ हिंगिसच्या नावावर आहेत. हिंगिसने भारतीय खेळाडूंसह चारही ग्रॅण्ड स्लॅमची जेतेपद जिंकली आहेत. २००६ मध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पध्रेत हिंगिसने महेश भूपतीसह मिश्र दुहेरीत बाजी मारली होती. मिश्र दुहेरीपाठोपाठ हिंगिस महिला दुहेरीच्या जेतेपदाच्या शर्यतीत आहे. भारताच्या सानिया मिर्झासह हिंगिसला मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत कजाकस्तानच्या यारोस्लाव्हा श्वेडोव्हा आणि ऑस्ट्रेलियाच्या कॅसी डेलेक्युआ यांच्याशी सामना होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा