अखेरच्या सराव सामन्याचा पुरेपूर फायदा इंग्लंडच्या फलंदाजांनी उठवत पहिल्याच दिवशी तीन फलंदाज गमावत ४०८ धावांचा डोंगर उभारला. केव्हिन पीटरसनने झंझावाती फलंदाजी करीत तडफदार नाबाद शतक ठोकले. पीटरसनने हरयाणाच्या गोलंदाजांची त्रेधा उडवली, तर कर्णधार अॅलिस्टर कुक, सलामीवीर निक कॉम्प्टन आणि इयान बेल यांनीही गोलंदाजीवर हात साफ करीत अर्धशतके फटकावली.
नाणेफेक जिंकत इंग्लंडने फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यांच्या फलंदाजांनी हरयाणाच्या गोलंदाजीची पिसे काढत तो योग्य असल्याचे दाखवून दिले. कुक आणि कॉम्प्टन या सलामीच्या जोडीने गोलंदाजांचा समर्थपणे सामना करीत अवघ्या ३४ षटकांमध्ये १६६ धावांची सलामी दिली. चारदिवसीय सामना असला तरी एकदिवसीय सामन्यासारखी फलंदाजी करत कुकने तब्बल २० चौकारांच्या मदतीने ९७ धावांची खेळी साकारली. कुक आता दुसऱ्या सराव सामन्यातही शतक झळकावणार, असे वाटत असतानाच फिरकीपटू जयंत यादवने त्याचा काटा काढला. अर्धशतक झळकावून पहिल्या-वहिल्या शतकाच्या दिशेने कूच करणाऱ्या कॉम्प्टनने संघाला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला खरा, पण अमित मिश्राने त्याला बाद करीत इंग्लंडला दुसरा धक्का दिला. कॉम्प्टन बाद झाल्यावर फलंदाजीला आलेला केव्हिन पीटरसन हा नेट्समध्ये सराव करून आल्यासारखाच वाटत होता. कुकने त्यांच्यावर हल्ला चढवल्यानंतर पीटरसनने जोरदार प्रहार करायला सुरुवात केली आणि ट्वेन्टी-२० सामना पाहत असल्याचा भास प्रेक्षकांना झाला. पीटरसनने तब्बल १६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने जखमी निवृत्त होऊन तंबूत परतण्यापूर्वी ९४ चेंडूंत ११० धावांची खेळी साकारली. पीटरसन बाद झाल्यावर इयान बेल (खेळत आहे ५७) आणि समित पटेल (खेळत आहे ११) यांनी संघाला चारशे धावांचा टप्पा ओलांडून देत दिवस सहजपणे खेळून काढला. भारतातर्फे तीनपैकी दोन बळी फिरकीपटू अमित मिश्राने मिळवले.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) : ९० षटकांत ३ बाद ४०८
(केव्हिन पीटरसन जखमी निवृत्त ११०, अॅलिस्टर कुक ९७, निक कॉम्प्टन ७४, इयान बेल खेळत आहे ५७; अमित मिश्रा २/ ५०)
पीटरसनने पिटले!
अखेरच्या सराव सामन्याचा पुरेपूर फायदा इंग्लंडच्या फलंदाजांनी उठवत पहिल्याच दिवशी तीन फलंदाज गमावत ४०८ धावांचा डोंगर उभारला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-11-2012 at 05:37 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Peterson belabour