धडाकेबाज फलंदाज केव्हिन पीटरसन गुडघ्याच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या सहाव्या हंगामात खेळू शकणार नाही. पीटरसन दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा भाग आहे. पीटरसनच्या दुखापतीमुळे डेअरडेव्हिल्सला आपल्या संघरचनेत आणि डावपेचांत महत्त्वपूर्ण बदल करावे लागणार आहेत.
सध्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी क्वीन्सटाउन येथे सराव करताना गुडघ्यात त्रास जाणवू लागला. तरीही पहिल्या दोन कसोटींत तो खेळला. मात्र नुकत्याच झालेल्या चाचणीत पीटरसनच्या उजव्या गुडघ्याला गंभीर दुखापत असल्याचे निष्पन्न झाले. पीटरसनच्या गुडघ्याच्या कवचाला धक्का बसला आहे. ही दुखापत बळावल्याने पीटरसन न्यूझीलंडविरुद्धची ऑकलंड येथे होणारी तिसरी आणि अंतिम कसोटी खेळू शकणार नाही. यासह आयपीएलच्या सहाव्या हंगामालाही तो मुकणार आहे. ३२ वर्षीय पीटरसन अधिक उपचारांसाठी इंग्लंडला रवाना होणार असल्याचे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे. गुडघ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी पीटरसनला सहा ते आठ आठवडय़ांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

Story img Loader