माजी विजेती पेट्रा क्विटोव्हा आणि ब्रिटनची लॉरा रॉबसन यांनी विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम १६ जणांमध्ये स्थान मिळवले आहे. रशियाचा मिखाईल यॉझनी आणि स्पेनचा फर्नाडो वेर्डास्को यांनीही चौथ्या फेरीत आगेकूच केली.
झेक प्रजासत्ताकच्या पेट्रा क्विटोव्हा हिने रशियाच्या एकतारिना माकारोव्हा हिला ६-३, २-६, ६-३ असे हरवूले. २०११ची विम्बल्डन विजेती आणि गेल्या वर्षी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणाऱ्या क्विटोव्हाला आता स्पेनच्या कार्ला सुआरेझ नवारो हिचे आव्हान पेलावे लागणार आहे. लॉरा रॉबसन हिने मारिना इराकोव्हिक हिचा १-६, ७-५, ६-३ असा पराभव केला. १९९८नंतर विम्बल्डनच्या अंतिम १६ जणींमध्ये स्थान मिळवणारी रॉबसन ही पहिली ब्रिटिश महिला खेळाडू ठरली. महिलांमध्ये अमेरिकेच्या स्लोएन स्टीफन्स हिने झेक प्रजासत्ताकच्या पेट्रा सेटकोव्हस्का हिला ७-६ (७/३), ०-६, ६-४ असे पराभूत केले.
पुरुषांमध्ये यॉझनी याने सर्बियाच्या विक्टर ट्रिव्होकी याचा ६-३, ६-४, ७-५ असा धुव्वा उडवला. वेर्डास्को याने लॅटव्हियाच्या अर्नेस्ट गल्बिस याच्यावर ६-२, ६-४, ६-४ अशी सहज मात केली. ऑस्ट्रेलियाच्या बर्नार्ड टॉमिकने रिचर्ड गास्केटला ७-६ (९/७), ५-७, ७-५, ७-६ (७/५) असा पराभवाचा धक्का दिला.
पेस, भूपती, बोपण्णा यांची आगेकूच
लंडन : भारताच्या लिएण्डर पेस, महेश भूपती व रोहन बोपण्णा यांनी विम्बल्डन स्पर्धेतील आव्हान कायम राखले. पेस-राडेक स्टेपानेक जोडीने जेमी डेल्गॅडो व मॅथ्यू एबडेन यांना ६-४, ६-४, ६-३ असे हरवले. भूपती-ज्युलियन नॉलेस यांनी निकोलस मोन्रो व सिमॉन स्टेडलर यांचा ३-६, ६-४, ६-४, ६-२ असा पराभव केला. बोपण्णा-एडवर्ड रॉजर व्हॅसेलिन जोडीने डॅनियल ब्रँड्स व लुकास रोसोल यांना ६-३, ५-७, ७-६ (७-४), ६-७, ६-४ असे नमवले.

Story img Loader