‘‘मी संघात होतो. पण खेळण्याची संधी मिळाली नाही. तरीही मी माझ्या ध्येयापासून परावृत्त झालो नाही. मी सतत खेळाचाच विचार करतो. संधी मिळाली की तिचे सोने कसे करता येईल, याची रणनीती मी आखलेली आहे. फक्त एकदा संधी मिळायला हवी,’’ असे फिलिपला मनोमनी वाटायचे. आता त्याला पुनरागमनाची संधी मिळणारच होती. पण त्यापूर्वीच तो मृत्यूच्या दाढेत अडकला. मैदानावर कसलीही तमा न बाळगणारा, डेल स्टेन, मकाया एन्टीनी, मार्ने मॉर्केलसारख्या तोफखान्याला विसाव्या वर्षी पहिल्याच दौऱ्यात अस्मान दाखवणारा फिल ह्य़ुजेस नावाचा तरणाबांड, रांगडा, जिगरबाज, हसमुख, मनस्वी, अजातशूत्र असलेला हा क्रिकेटपटू अवघ्या २५व्या वर्षी जिवाला चटका लावून आपल्यातून निघून गेला; नाही तर आज त्याने २६वा वाढदिवस साजरा केला असता. पण कुणाच्या ललाटलेखात काय लिहिले आहे, याचा कधीही अदमास लागत नाही, तसेच त्याचेही. हे वय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाय रोवायचे होते, तसे त्याचे प्रयत्नही सुरूच होते. संघर्ष तसा त्याच्या पाचवीलाच पुजलेला. पण त्याने लढणे कधीच सोडले नव्हते. फक्त मृत्यूशी लढताना त्याला अपयश आले तेवढेच.
फिल हा शेतकऱ्याचा मुलगा. त्याचे वडील ग्रेग केळ्यांची शेती करायचे. क्रिकेटमधून उसंत मिळाली की वडिलांना शेतीमध्ये मदत करायला त्याला आवडायचे. घरातला लाडकाच होता तो. न्यू साऊथ वेल्समधील मॅक्सव्हिल गावात त्यांच्या घराच्या अंगणात क्रिकेटचा सराव करत असायचा. तो रग्बीही खेळायचा, पण वेड होते ते क्रिकेटचेच. अंगणात सराव करत असताना घरात चेंडू जाणार नाही, याची दखलही तो घ्यायचा. आपल्या क्रिकेटमुळे घरचे नुकसान होऊ नये, ही समज त्याच्यामध्ये लहानपणीच होती. सुवासिक फुलांच्या पठढीत रानफूल बसत नसले तरी त्याला फुलण्यावाचून कोणीही रोखू शकत नाही. तसेच फिलच्या फलंदाजीचे. पुस्तकी फलंदाजी त्याच्या पचनी पडलीच नाही, पण तरीही त्याची फलंदाजी नेत्रदीपक होती. त्याने स्वत:च्या कल्पकतेने नवीन फटके बनवले, ज्याचा अंदाज कोणत्याही गोलंदाजाला यायचा नाही आणि त्यामुळेच तो क्रिकेटरसिकांच्या लक्षात राहिला.
मॅक्सव्हिलच्या एका क्लबमध्ये खेळत त्याने कोणताही गॉडफादर नसताना १७व्या वर्षी सिडनी गाठले, ते स्वकर्तृत्वाच्या जोरावरच. स्थानिक सामन्यांमध्ये धावांचा रतीब घालत त्याने ऑस्ट्रेलियाच्या संघाचे दार ठोठावले आणि वयाच्या २०व्या वर्षी त्याचे देशाकडून खेळायचे स्वप्न पूर्ण झाले. पहिल्या डावात त्याला भोपळाही फोडता आला नव्हता. पण त्यानंतर त्याच्या लाजवाब खेळींनी साऱ्यांनाच मंत्रमुग्ध केले. दुसऱ्या सामन्यात दोन्ही डावांत शतक झळकावत तो प्रकाशझोतात आला. त्याच्या खेळण्याची पद्धत पाहिली की अ‍ॅडम गिलख्रिस्टची आठवण यायची, असे कर्णधार रिकी पॉन्टिंग म्हणाला होता. पण आयुष्यातील चढ-उतार कारकिर्दीतही आलेच. पुढे खेळात सातत्य न राखल्यामुळे संघाबाहेर गेला. त्याची चूक त्याला उमगली होती. त्यामुळेच त्याने पुन्हा एकदा स्थानिक सामन्यांमध्ये धावांची टांकसाळ उघडायला सुरुवात केली होती. आता काहीही करून संघात स्थान मिळवायचे स्वप्न तो बघत होता. भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला संधी मिळणारही होतीच. कारण मायकेल क्लार्क तंदुरुस्त नसल्याने त्याची निवड जवळपास नक्की समजली जात होती. संधी मिळाल्यावर कोणतीही कसूर सोडायची नाही, यासाठी तो स्थानिक सामन्यात खेळायला उतरला. अर्धशतक झळकावून शतकाच्या दिशेने त्याने कूच केली, नाबाद ६३ ही त्याची अखेरची धावसंख्या, पण आयुष्याच्या सामन्यात मात्र तो फार लवकरच बाद झाला.
मित्र जोडण्याचा त्याला छंद होता. त्यामुळेच संघात कितीही स्पर्धा असली तरी त्याची सगळ्यांशी मैत्री होती. स्पर्धा आपल्या जागी आणि मैत्री आपल्या, त्यामध्ये कधीही त्याच्याकडून गल्लत झाली नाही. संघातील प्रत्येकाला त्याने लळा लावला होता. त्यामुळेच त्याची निधनाची बातमी ऐकून ऑस्ट्रेलियाचा संघ कोलमडला.
उसळता चेंडू हा त्याचा कच्चा दुवा होता. २००९च्या अ‍ॅशेस मालिकेत यामुळेच त्याला जास्त धावा करता आल्या नाहीत आणि तो संघाबाहेर फेकला गेला. शॉन अ‍ॅबॉटने कदाचित त्याच्या फलंदाजीचा अभ्यास करून त्याला बाद करण्यासाठी उसळता चेंडू टाकला आणि तोच त्याचा घात करून गेला. तरुण मुलगा गेल्याच्या दु:खाने त्याच्या आई-वडिलांवर पहाडच कोसळला आहे. कळी उमलल्यावर पूर्ण फुलण्यापूर्वीच तिच्यावर कोमेजण्याची वेळ यावी, असेच काहीसे फिलच्या बाबतीतही घडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा