ब्रायन लारा, शेन वॉर्न यांच्यासह ऑस्ट्रेलियाच्या सर्व वलयांकित आजी-माजी क्रिकेटपटूंची उपस्थिती.. तब्बल पाच हजार क्रिकेटप्रेमींची गर्दी.. पण त्या गर्दीत खेळाच्या रंगतीबरोबर उसळत जाणारा नेहमीचा जोश नव्हता.. होती एक हृदयार्त सहवेदना.. पराभवात दु:ख वाटून घेणाऱ्या, दडपणामध्ये उत्साह वाढवणाऱ्या आणि विजयाचा आनंद द्विगुणित करणाऱ्या आपल्या एका तरण्याबांड, अजातशत्रू सहकाऱ्याला अखेरचा निरोप देताना ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे डोळे पाणावलेले होते. सलामीवीर फिल ह्य़ुजेसला अंत्यविधी कार्यक्रमामध्ये अखेरचा निरोप देताना त्याचे कुटुंबिय, आप्तेष्ट, आजी-माजी खेळाडू या साऱ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. अश्रू अनावर झाले, बांध फुटला. भावना व्यक्त करता येत नव्हत्या. ह्य़ुजेस आपल्यात नाही, यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. क्रिकेटच्या मैदानावर हातात बॅट धरतच जीवनाचा निरोप घेतलेल्या पंचविशीतील उमद्या ह्य़ुजेसला अखेरची सलामी देण्यासाठी जमलेल्या प्रत्येकाचं अंतर्मन हेलावलं होतं. हा क्षण प्रत्येकासाठीच भावनिक कसोटीचाच होता.
मॅक्सव्हिले या ह्य़ुजेसच्या गावी त्याला अंतिम निरोप देण्यासाठी पाच हजारांहून क्रिकेटप्रेमी जमले होते. यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अबॉट उपस्थित होते. आपल्या लाडक्या संघसहकाऱ्याला निरोप देण्यासाठी ग्लेन मॅकग्रा, अ‍ॅडम गिलख्रिस्ट यांच्यासह ऑस्ट्रेलियाचे सर्व आजी-माजी क्रिकेटपटू उपस्थित होते. मॅक्सव्हिलेमधील एका शाळेत आयोजित या कार्यक्रमात फादर मायकेल अलकॉक यांनी विधींचे संचालन केले.
शेफिल्ड शिल्ड लढतीदरम्यान गोलंदाज शॉन अबॉटचा उसळता चेंडू ह्य़ुजेसच्या मानेवर आदळला. गंभीर आघातामुळे ह्य़ुजेस मैदानातच कोसळला. मैदानात आणि त्यानंतर रुग्णालयात त्याला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. मात्र दोनच दिवसांत ह्य़ुजेसची प्राणज्योत मालवली.
शोकप्रार्थना समारंभानंतर ह्य़ुजेसचे पार्थिव वाहून नेणारी शवपेटी ह्य़ुजेसचे वडील, भाऊ जेसन, ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार मायकेल क्लार्क, ट्वेन्टी-२० कर्णधार आरोन फिंच, ह्य़ुजेस मैदानावर कोसळला त्याक्षणी त्याचा साथीदार टॉम कूपर, मिचेल लॉन्ग्रेगन, मॅथ्यू डे यांनी वाहिली. यानंतर रहिवाशांना ह्य़ुजेसचे अंतिम दर्शन मिळावे यासाठी शवपेटी मॅक्सव्हिले परिसरात नेण्यात आली. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी ह्य़ुजेसला गार्ड ऑफ ऑनर दिला. यानंतर ह्य़ुजेसला अंतिम निरोप देण्यात
आला.

मोदींची ह्य़ुजेसला श्रद्धांजली
 फिलिप ह्य़ुजेसला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी श्रद्धांजली वाहिली. ‘‘फिलिप, तुझी उणीव जाणवेल. तुझ्या खेळाने आणि उत्साहाने जगभरातल्या चाहत्यांना तू आपलेसे केलेस. तुझ्या आत्म्याला शांती लाभो,’’अशा शब्दांत मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून ह्य़ुजेसला आदरांजली अर्पित केली.

ह्य़ुजेस कुठून तरी अवतरेल – क्लार्क
ह्य़ुजेसला खांदा दिल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करत असताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क म्हणाला की, ‘‘मला आताही ह्य़ुजेस कुठून तरी अवतरेल असे वाटते. मी त्यालाच शोधतो आहे. यालाच अज्ञात शक्ती म्हणतात का? तर ही शक्ती माझ्यासमवेत आहे. आणि ती मला सोडून कधीच जाणार नाही. गुरुवारी रात्री मी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर गेलो.  याच मैदानावर मी आणि फिलीपने असंख्य भागीदाऱ्या रचल्या. याच मैदानावर अनेकदा धोकादायक फटके खेळून आम्ही मोठय़ा खेळ्या केल्या होत्या. आमच्या डोक्यातली अनेक स्वप्ने आम्ही याच मैदानावर प्रत्यक्षात साकारली. लोकांना जोडणे त्याला आवडत असे. क्रिकेटप्रती असलेली अमाप निष्ठा त्याचे वैशिष्टय़ होते.’’
तो पुढे म्हणाला की, जगभरातल्या व्यक्तींनी, जे फिलीपला ओळखतही नव्हते, त्यांनी बॅटद्वारे त्याला श्रद्धांजली वाहिली. पुष्पहार अर्पण केले, तो बरा व्हावा यासाठी लक्षावधी लोकांनी प्रार्थना केली. क्रिकेट खेळणारा प्रत्येक देश यानिमित्ताने एकरूप झाला होता. ह्य़ुजेसने जपलेली खेळभावना चिरंतन राहील आणि त्याने क्रिकेट समृद्ध होणार आहे. फिलीपची खेळभावना आता खेळाचा अविभाज्य भाग झाली आहे. खेळाचे पाईक म्हणून आपण ही खेळभावना जोपासायला हवी. त्यातून बोध घ्यायला हवा. आपण खेळत राहायला हवे. माझ्या लहान भावा, तुझ्या आत्म्याला शांती लाभो. मैदानात भेटूया’ या शब्दांत आपल्या भावना व्यक्त करताना क्लार्कला अश्रू अनावर झाले.

यापेक्षा समंजस लहान भाऊ मिळू शकत नाही. तू आमचा हिरो आहेस. तुला अंतिम निरोप द्यायचा आहे यावर माझा विश्वास बसत नाहीये. आपल्या अंगणात रंगणारे सामने मी कधीच विसरणार नाही. तुला नेहमी जिंकायचे असायचे, सतत फलंदाजी करणे तुला आवडायचे.
– जेसन, फिलचा भाऊ

तू माझा भाऊ आहेस. याचा मला सार्थ अभिमान आहे. माझा सगळ्यात चांगला मित्र आणि माझा आदर्श. तुझ्या उपस्थितीत लोकांना जिंकून घेण्याचे सामथ्र्य होते. तुझे कर्तृत्व झळाळून निघत असतानाही तू बदलला नाहीस.
– मेगन, फिलची बहिण

फिल तुझी उणीव आम्हाला नक् कीच भासणार आहे. नव्या गोष्टी शिकण्याचा तुझा उत्साह आणि सर्वोत्तमाचा ध्यास तुझे गुणवैशिष्टय़ होते. तुझ्या आत्म्याला शांती लाभो, हीच प्रार्थना.
– सचिन तेंडुलकर, भारताचा माजी फलंदाज