‘पेनल्टीवर किक लगावण्यासाठी मी सज्ज आहे,’ स्पेन संघासंदर्भातील एका माहितीपटातील सेस्क फॅब्रेगसचे हे उद्गार. त्यानंतर सेस्क फॅब्रेगसच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली. २००८च्या युरो चषकातील स्पेनचा इटलीविरुद्धचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना. फॅब्रेगसने आतापर्यंतच्या व्यावसायिक कारकिर्दीत एकदाही पेनल्टी-किक लगावली नव्हती. त्याच्या एका किककडे सर्वाच्या नजरा खिळल्या होत्या. त्याच्या एका किकमुळे स्पेनला आतापर्यंत न मिळालेले यश मिळणार होते. स्पेन युरो चषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारणार होता. त्याच्या पायाने चेंडूला स्पर्श केला आणि स्पेनच्या यशाचा सिलसिला सुरू झाला. स्पेनचा कर्णधार आयकर कॅसिल्लाने युरो-२००८चा चषक उंचावला. त्यानंतर पाहता-पाहता स्पेनने २०१०चा विश्वचषक आणि युरो-२०१२ चषकावरही नाव कोरले.
सहा वर्षांपूर्वी स्पेन संघाला फक्त अपयशाचा सामना करावा लागत होता. पण सहा वर्षांनंतर स्पेनने आपल्या गुणवत्तेच्या आधारावर जगातील सर्वोत्तम संघ होण्याचा मान पटकावला. सध्याचा स्पेनचा संघ म्हणजे त्यांच्या इतिहासातील सर्वोत्तम संघ आहे. स्पेनचा संघ यशाच्या शिखरावर असला तरी नेदरलँड्सला मात्र याच यशाने हुलकावणी दिली. २०१०मधील विश्वचषकाच्या जोहान्सबर्ग येथील अंतिम फेरीतील पराभवाच्या स्मृती वेस्ली श्नायडरच्या मनावर अद्यापही कोरल्या गेल्या आहेत. प्रत्येक दिवशी त्याला तो क्षण अगदी लख्खपणे आठवतोय. ‘‘पेनल्टी-शूटआऊटच्या अगदी जवळ आलो होतो. अतिरिक्त वेळेनंतर सामना संपायला फक्त तीन मिनिटे शिल्लक होती. पण आंद्रेस इनियेस्टाने ११७व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे घात झाला. हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात वाईट क्षण होता. विश्वचषकाच्या जवळून जाऊनही विश्वचषक न उंचावणे, सर्वात खेदजनक होते,’’ ब्राझीलमध्ये दाखल झाल्यानंतरची श्नायडरची ही प्रतिक्रिया. त्या सामन्यात पिवळे कार्ड न दाखवला गेलेला श्नायडर हा नेदरलँड्सच्या दोन खेळाडूंपैकी एक (रेफरी हॉवर्ड वेब यांनी या सामन्यात १४ पिवळी आणि एक लाल कार्ड दाखवले होते). आता चार वर्षांनंतर नेदरलँड्सचा संघ त्या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करणार आहे. गेल्या विश्वचषकातून डच्चू न मिळालेल्या नेदरलँड्सच्या सात खेळाडूंपैकी श्नायडर हा एक.
दुसरीकडे स्पेनने विश्वचषक विजेत्या संघातील १८ खेळाडूंना कायम ठेवले आहे. त्यापैकी ११ खेळाडूंनी गेल्या सहा वर्षांत जिंकलेल्या तिन्ही प्रतिष्ठेच्या स्पर्धाच्या जेतेपदाची चव चाखलेली आहे. २०१०पासून स्पेन संघासोबत असलेल्या विन्सेन्ट डेल बॉस्के यांच्या भरवशाचे हे खेळाडू. अनेक तज्ज्ञांनी, फुटबॉलपंडितांनी या वेळी स्पेन संघ ब्राझीलला हरवून जेतेपद पटकावेल, असा अंदाज वर्तवला आहे. ‘हे तत्त्वज्ञान खरे आहे का?’ असा प्रश्न बुधवारी स्पेनचा मधल्या फळीतील खेळाडू कोके याने विचारला होता. ‘‘जिंकण्याची अफाट ध्येयासक्ती असल्यामुळेच आम्ही जगज्जेते ठरू,’’ हे कोकेचे त्यावरील उत्तर.
पण नेदरलँड्सचा स्टार खेळाडू आर्येन रॉबेनने या वेळी स्पेनला हरवण्याचा विडाच उचलला आहे. रॉबेन म्हणतो, ‘‘बायर्न म्युनिककडून खेळताना प्रस्थापितांना हरवण्यासाठी चाहत्यांचे किती दडपण असते, याचा अनुभव मला आहे. जोहान्सबर्गमधील अंतिम फेरीत स्पेनचा गोलरक्षक कॅसिल्ला विरुद्ध मी असेच समीकरण होते. पण मी बऱ्याच संधी वाया घालवल्या. त्या क्षणांचा विचार मनात आल्यानंतर निराश व्हायला होते.’’ हे दोन्ही दिग्गज संघ शुक्रवारी मध्यरात्री होणाऱ्या सामन्यात भिडणार असल्यामुळे जुन्या आठवणी ताज्या होणे स्वाभाविकच होते. नेदरलँड्स संघ त्या पराभवाच्या स्मृतींवर विजय मिळवून पडदा टाकणार, की स्पेन संघ २०१४च्या अभियानाची थाटात सुरुवात करणार, याचीच उत्सुकता लागून राहिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा