दंगल या हिंदी चित्रपटामुळे अधिक लोकप्रिय ठरलेल्या फोगट भगिनींना कुस्तीच्या राष्ट्रीय शिबिरातून हाकलण्यात आले आहे. गीता, बबिता, रितू आणि संगीता या चारही फोगट भगिनींना त्यांच्या बेशिस्तपणा आणि नखऱ्यांमुळे शिबिरात ‘नो एन्ट्री’ असल्याचे कुस्ती महासंघाकडून सांगितले जात आहे.

सध्या सुरु असलेल्या शिबिरात कोणतीही पूर्वसूचना न देता अनुपस्थित राहिल्यामुळे कुस्ती महासंघाने ही कडक कारवाई केली आहे. पूर्वी बेशिस्तपणाच्या तक्रारी येऊनही गीता आणि बबिता यांच्या बाबतीत महासंघ नरमाईची भूमिका घेतो, असे म्हटले जात होते. मात्र आता तसे न करता महासंघाने चारही भगिनींना शिबिरातून हाकलून दिले आहे. या चौघींना त्यांच्या या वागणुकीबाबत कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.

आशियाई खेळांसाठी सध्या लखनौ येथे शिबीर सुरु आहे. या शिबिरातील खेळाडूंना एशियाड खेळांमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. मात्र फोगट भगिनींना या स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार नाही, असे महासंघाच्या अधिकाऱ्याने सांगितल्याचे वृत्त आहे. त्यामुळे फोगट भगिनींना आता आशियाई खेळांमध्येदेखील भारताचे प्रतिनिधित्व करता येणार नाही. हे आशियाई खेळ यंदाच्या ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान जकार्ता आणि पालेमबंग येथे होणार आहेत.

दरम्यान, आपण दुखापतग्रस्त असल्याने शिबिरात सहभागी होऊ शकलो नसल्याचे बबिताने सांगितले आहे. मात्र गीता आणि इतर दोघींच्या अनुपस्थितीबाबत काहीही कल्पना नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे.

Story img Loader