महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी १५ जणांचा जबाब नोंदवल्यानंतर हे आरोपपत्र निश्चित केले. यावेळी पोलिसांनी तांत्रिक पुरावे म्हणून काही फोटोही ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे आता कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात करण्यात आला आहे. परंतु, त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती. त्यामुळे भारतातील अग्रगण्य कुस्तीपटूंनी जंतर मंतरवर आंदोलन पुकारले होते. ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल होऊन कारवाई होत नाही तोवर आंदोलन थांबवणार नसल्याचं कुस्तीपटूंनी ठरवलं होतं. अखेर ब्रिजभूषण यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर कुस्तीपटूंनी आंदोलन स्थगित केलं. आता ब्रिजभूषण यांच्याविरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आलं आहे. लैंगिक छळ, विनयभंग आणि पाठलाग आदी गुन्ह्यांबाबत त्यांना शिक्षा ठोठावली जाऊ शकते, असे दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रात नमूद केले आहे.
हेही वाचा >> ब्रिजभूषण यांच्यावरील आरोपांत तथ्य; पोलिसांचा आरोपपत्रात दावा
१३ जून रोजीच्या या आरोपपत्रात ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम ५०६ (गुन्हेगारी धमकी), ३५४ (महिला विनयभंग); ३५४ अ (लैंगिक छळ) आणि ३५४ ड (पाठलाग) लागू करण्यात आले आहे. एका प्रकरणात ब्रिजभूषण यांनी संबंधिताचा वारंवार छळ केल्याचे तपासात निदर्शनास आले आहे. सहापैकी दोन प्रकरणांत ब्रिजभूषण यांच्यावर ‘कलम ३५४, ३५४ अ आणि ३५४ ड’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चार प्रकरणांत ‘कलम ३५४’ आणि ‘३५४ अ’अंतर्गत आहेत. त्यानुसार पाच वर्षांपर्यंत कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
तपासात आढळले फोटो
भारतीय कुस्ती महासंघाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना चार फोटो पुरवले आहेत. परदेश दौऱ्यात पीडित महिला कुस्तीपटूंसह ब्रिजभूषणही होते, हे दर्शवणारे ते फोटो आहेत. या पैकी दोन फोटोंमध्ये ब्रिजभूषण महिला कुस्तीपटूंबरोबर गैरवर्तन करताना दिसत आहेत, असं आरोपपत्रात म्हटलं आहे. तसंच, ब्रिजभूषण सिंह यांचे कार्यालय, कुस्ती महासंघाचे कार्यालय आणि ब्रिजभूषण सिंह यांच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने तेथील पुरावे पोलिसांना मिळू शकले नाहीत.
फोटोंसह साक्षीदारांचे कॉल डिटेल्सही तपासण्यात आले आहेत. यानुसार, लैंगिक छळाच्या घटना ज्या ठिकाण झाल्या त्याठिकाणी ब्रिजभूषण सिंह उपस्थित होते, असंही या आरोपपत्रात दावा करण्यात आला आहे.
चौकशी समिती आणि पोलीस तपासात विरोधाभास
यंदा फेब्रुवारीच्या प्रारंभी कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंग यांच्याविरुद्ध जाहीर आरोप केले होते. या संदर्भात जागतिक अजिंक्यपद विजेत्या मुष्टियोद्ध्या मेरी कोम यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या चौकशीदरम्यानही या कुस्तीपटूंनी हे आरोप केले होते. मात्र, एकीकडे ब्रिजभूषण यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना शिक्षा व्हावी, इतपत गंभीर आरोप असल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, दुसरीकडे चौकशी समितीसमोरही हेच आरोप करण्यात आले असताना या समितीने याबाबत गंभीर दखल घेऊन पोलीस कारवाईची शिफारस क्रीडा मंत्रालयाला दिलेल्या अहवालात केली नव्हती. कुस्तीपटूंनी हे आरोप प्रथम केल्यानंतर ही समिती २३ जानेवारी रोजी नियुक्त करण्यात आली. फेब्रुवारीत या समितीने संबंधितांची चौकशी केली होती.