भारतीय संघ सध्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत व्यग्र आहे. तर दुसरीकडे कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर महेंद्रसिंह धोनी त्याच्या खांदयावरील इतर जबाबदाऱ्या पार पाडण्याचा प्रयत्न करतो आहे. महेंद्रसिंह धोनी व ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा यांना लष्करातर्फे लष्कर प्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांच्या हस्ते लेफ्टनंट कर्नल हा हुद्दा देऊन गौरविण्यात आले होते. धोनीने अतिशय शिस्तबद्ध व निष्ठेने संघाचे नेतृत्व करीत संघास विश्वचषक जिंकून दिला. त्याची कामगिरी लष्करातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यास साजेशी असल्यामुळेच त्याला लष्करातर्फे गौरविण्यात आले होते.

धोनीने बुधवारी श्रीनगरमधील आर्मी पब्लिक स्कुलला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अभ्यासासोबत खेळाला प्राधान्य देणे महत्त्वपूर्ण असल्याचे त्याने विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. ‘चिनार क्रॉप्स ऑफ इंडियन आर्मी’च्या ट्विटर अकाऊंटवरुन धोनीच्या श्रीनगर दौऱ्यातील फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोमध्ये धोनी आर्मीच्या पोशाखात विद्यार्थी आणि अन्य लोकांची संवाद साधताना दिसतो आहे.

धोनीने २०१४ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर कर्णधारपद सोडून तो एकदिवसीय आणि टी-२० सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करतो आहे. भारतीय क्रिकेट टीम श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यात व्यग्र असल्यामुळे धोनी या काळात संघातून बाहेर आहे. १० डिसेंबरला श्रीलंकेविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी तो पुन्हा भारतीय संघाचा हिस्सा असेल. तोपर्यंत धोनी आपल्या अन्य जबाबदाऱ्या पार पाडण्याचा प्रयत्न करतोय, असेच दिसते.

Story img Loader