उदरनिर्वाहाचे क्षेत्र आणि छंद, यापैकी एकाची निवड करण्याची वेळ आयुष्यात सर्वावर कधीनाकधी तरी येते. या दोघांची जपवणूक करण्याचे यश फार कमी जणांना मिळवता आले आहे. यामध्ये मुंबईकर स्नेहा शर्माच्या नावाचाही आवर्जुन उल्लेख करता येईल. व्यावसायाने वैमानिक असलेल्या स्नेहाने फॉम्र्युला-वन या पुरुषप्रधान खेळात स्वत:चा ठसा उमटवून अनेक तरूणींसमोर आदर्श निर्माण केला आहे. कोईम्बतुर येथे सुरू असलेल्या जेके टायर राष्ट्रीय अजिंक्यपद शर्यतीत ‘एलजीबी फॉम्र्युला-४’ प्रकारात स्नेहा सहभागी झाली आहे. दीड वर्षांत ३० किलो वजन घटवणे, स्पध्रेसाठीचा प्रवास करताना पुस्तकांनी भरलेले दफ्तर घेऊन फिरणे, आई-वडिलांशी खोटं बोलून.. लपून छपून अनेक स्पर्धामध्ये सहभाग घेणे, आदी अनेक करामती करून स्नेहाने आपला हा छंद जोपासला.
कोईम्बतूर शर्यतीपूर्वी तिने अनेक स्पर्धामध्ये स्वत:चा ठसा उमटवला. वडिल र्मचट नेव्हीमध्ये कॅप्टन पदावर कार्यरत असल्यामुळे लहानपणापासूनच तिला तंत्रज्ञानाने आकर्षित केले. सतत काहीतरी नवीन करण्याची जिद्द तिला मोटार शर्यतीकडे घेऊन आली. ‘मी सतत नवनवीन गोष्टींच्या शोधात असायचे. आठवी इयत्तेत असताना एकदा कार्टीग शर्यत पाहिली होती. त्यामुळे या शर्यतीविषयी जाणून घेण्याची उत्सुकता वाढली. साठवणीतले आणि घरच्यांकडून खर्चासाठी मिळत असलेले पैसे कार्टीग शर्यतीसाठी खर्ची केले. दीड वर्षांत ३० किलो वजनही कमी केले,’ असे स्नेहा सांगते.
घरच्यांचा विरोध शमवण्यासाठी स्नेहाने स्पध्रेसाठी प्रवासादरम्यान अभ्यास करण्याची शक्कल लढवली. पुस्तक घेऊन ती प्रवास करायची. इयत्ता आठवीपासून स्नेहा या खेळाकडे वळली. तिचे हे आकर्षण पाहून घरच्यांना अधिक चिंता वाटत होती. त्यांनी तिला विरोध केला, परंतु अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता या खेळाबाबत अधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न तिने सुरूच ठेवले.
‘वैमानिक प्रशिक्षणासाठी घरच्यांनी ४० -४५ लाख रुपये कर्ज काढले होते. मोटार शर्यतीमधील माझे वेड पाहून कुटुंबियांना व्यथित केले होते. पण, दोन्ही क्षेत्रांमध्ये राखलेल्या समतोलानंतर त्यांचा विरोध आता मावळला,’ असे स्नेहा म्हणाली.
वयाच्या १७व्या वर्षी वैमानिक प्रशिक्षणासाठी ती कॅलिफोर्नियाला गेली. त्यावेळी काही काळ ती शर्यतीपासून दूर होती, परंतु भारतात परतल्यावर पुन्हा ती छंदाकडे वळली. वैमानिक आणि एफ-४ शर्यत या दोन्ही क्षेत्रांना खूप वलय आहे. वैमानिक क्षेत्रासाठी मानसिक कणखरता हवी, तर शर्यतीसाठी शारीरिक. त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही तंदुरूस्त ठेवण्यासाठी स्नेहा कसून व्यायाम करते. कामाच्या वेळा बदलल्या तरी वेळात वेळ काढून व्यायाम करणे आणि दोन्ही क्षेत्रांमध्ये अजून उंच भरारी घेण्याचा तिचा निर्धार आहे.
अनंत, विष्णूची आघाडी
अनंत शन्मुघम आणि विष्णू प्रसाद यांनी अनुक्रमे युरो जे के १६ आणि एलजीबी फॉम्र्युला -४ शर्यतीच्या दुसऱ्या फेरीत विजय मिळवून जेके टायर राष्ट्रीय अजिंक्यपद शर्यतीचा पहिला दिवस गाजवला. जेके टुअरिंग मोटार प्रकारात आशिष रामास्वामीने एकहाती वर्चस्व गाजवले.
- संक्षिप्त निकाल : एजीबी ४ : १. विष्णू प्रसाद, २. अश्विन सुंदर, ३. राघुल रंगासामी; जेके टुअरिंग मोटार : १. आशिष रामास्वामी, २. ए. शिवरामकृष्णन, ३. राधा सेल्वारान;
- युरो जेके १६ : पहिली फेरी : १. आनंद शन्मुघम, २. कार्तिक थरानी, ३. नयन चॅटर्जी. दुसरी फेरी : १. आनंद शन्मुघम, २. कार्तिक थरानी, ३. नयन चॅटर्जी