India vs Australia World Cup Final 2023: रविवारी (१९ नोव्हेंबर) होणाऱ्या ब्लॉकबस्टर सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ सज्ज झाले आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये राजकारणी आणि मनोरंजन क्षेत्रातील तारे-तारकांसह सुमारे १ लाख ३० हजार प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत. त्याच्यासमोर दोन्ही संघातील २२ खेळाडू विजयासाठी एकमेकांशी भिडणार आहेत. सव्वा लाखांहून अधिक प्रेक्षक भारतीय संघाला पाठिंबा देतील आणि कांगारूंसमोर हे सर्वात मोठे आव्हान आहे. या सामन्याआधी पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रमने अहमदाबादची खेळपट्टी आणि टीम इंडियाची फलंदाजी यावर सूचक विधान केले आहे.
वसीम अक्रम म्हणाला की, “ भारतातील प्रत्येक ठिकाणचे हवामान आणि खेळपट्टी वेगवेगळी असते. त्यामुळे त्या त्या ठिकाणच्या खेळपट्टीवर खेळपट्टीवर खेळण्याची भारतीय संघाला सवय झाली आहे. हा आशियातील सर्वात मजबूत फलंदाजी असलेला संघ आहे. त्यामागील कारण म्हणजे, त्यांनी संपूर्ण भारतातील खेळपट्ट्यांवर फलंदाजी केली आहे. त्यामुळेच त्यांना त्याची सवय झाली आहे. भारतातील प्रत्येक मैदान हे वेगळे आहे. कुठे मोठी सीमारेषा आहे तर कुठे लहान आहे. त्यामुळे त्यानुसार त्यांनी स्वतःहा ला त्यानुसार तयार केले आहे. त्यामुळेचं आज टीम इंडियाची फलंदाजी इतकी परिपूर्ण झाली आहे. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी खेळपट्टी ही वेगळ्या स्वरुपाची आहे. त्यामुळे अहमदाबादची खेळपट्टीही मुंबईपेक्षा वेगळी असेल.”
मिस्बाह-उल-हक यावर पुढे म्हणाला, “भारतातील विविध ठिकाणच्या मैदानातील खेळपट्टी ही त्या-त्या विभागातील मातीपासून तयार करण्यात आली आहे. कुठे लाल माती, कुठे काळी माती तर कुठे आणखी दोन्हींचे मिश्रण असलेल्या मातीपासून तयार करण्यात आलेली खेळपट्टी. यामुळे त्या त्या ठिकाणचे गुणधर्म हे त्याठिकाणी ती खेळपट्टी दाखवते. चेन्नईमध्ये फिरकीला मदत करणारी खेळपट्टी आहे. मुंबईमध्ये लाल मातीची खेळपट्टी असून ती वेगवान गोलंदाज आणि फलंदाजांना अधिक मदत करते. कोलकाताची खेळपट्टी ही काळ्या मातीची असून त्या ठिकाणी फिरकी आणि वेगवान गोलंदाजांना अधिक मदत करते. प्रत्येक ठिकाणचे हवामान देखील वेगळे आहे. कुठे दमट, थंड तर कुठे आणखी वेगळं. त्यामुळे टीम इंडियाला याची सवय झाली आहे. त्यामुळेच मला वाटते की, अंतिम सामना जिंकण्याची संधी ही भारताला अधिक आहे.”
भारतीय संघ फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यानंतर संघाला नवे कॉम्बिनेशन मिळाले आणि ते त्याच्यापेक्षा खूपच सरस ठरले. हार्दिक बाद झाल्यानंतर शार्दुललाही संघात अजून स्थान मिळाले नाही. या दोघांच्या जागी सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमीचा समावेश करण्यात आला. संघात येताच शमीने जबरदस्त कामगिरी केली आहे आणि तो आजतागायत थांबलेला नाही. त्याने सहा सामन्यांत २३ विकेट्स घेतल्या.
अश्विन परतणार का?
सोशल मीडियावर अनेक क्रिकेटविश्लेषक टीम इंडियाला ऑस्ट्रेलियन संघ पाहता रविचंद्रन अश्विनला संधी द्यावी, असे सुचवत आहेत. अश्विन या विश्वचषकात फक्त एकच सामना खेळला आहे. त्याला चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली. त्याने ३४ धावांत एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियन संघाचे दोन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेड हे डावखुरे फलंदाज आहेत. अश्विन त्यांच्याविरुद्ध खूप प्रभावी ठरू शकतो. त्याचा स्टीव्ह स्मिथविरुद्धचा विक्रमही उत्कृष्ट आहे. मोहम्मद सिराजऐवजी रोहित शर्माने अश्विनला संधी द्यावी, असे बोलले जात आहे. मात्र, हे घडणे खूप कठीण मानले जात आहे आणि रोहित प्लेइंग-११ मध्ये बदल करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसते.