प्रो कबड्डी लीगचा (PKL) ७७वा सामना हरयाणा स्टीलर्स आणि तेलुगू टायटन्स यांच्यात ३९-३९ असा बरोबरीत सुटला. बरोबरीनंतर हरयाणा स्टीलर्सचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला असून तेलुगू टायटन्स अजूनही शेवटच्या स्थानावर आहे. यंदाच्या लीगमधील हा १५वा बरोबरीत सुटलेला सामना आहे.
तेलुगू टायटन्सचा कर्णधार रोहित कुमारने या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. त्याला सामन्यात ५ रेड आणि ३ टॅकल पॉइंट मिळाले. दरम्यान, त्याने सुपर रेडही केली. हरयाणा स्टीलर्सने पहिल्या हाफनंतर २०-१९ अशी आघाडी घेतली. हरयाणा स्टीलर्स संघाने जबरदस्त सुरुवात करून तेलुगू टायटन्सवर दडपण आणले. विकास कंडोलानेही सुपर रेड करताना तीन बचावपटूंना बाद केले. दरम्यान, ऋतुराज कोरवीने सुपर टॅकल करत संघाला ऑलआऊटपासून वाचवले. मात्र, लवकरच हरयाणा स्टीलर्सच्या संघाने टायटन्सला ऑलआऊट केले. तेलुगू टायटन्सनेही जबरदस्त पुनरागमन केले आणि पहिल्या हाफच्या समाप्तीपूर्वी हरयाणा स्टीलर्सला ऑलआऊट केले.
हरयाणा स्टीलर्सने दुसऱ्या हाफची सुरुवातही चांगली केली, पण तेलुगू टायटन्सचा कर्णधार रोहित कुमारने सुपर रेड टाकत ३ बचावपटू बाद केले. असे असतानाही हरयाणानेही आपली आघाडी चमकदारपणे राखली. अंकित बेनिवालला त्याच्या चढाईत दोन गुण मिळाले. सामन्याच्या ३०व्या मिनिटाला हरयाणा स्टीलर्स दुसऱ्यांदा ऑलआऊट झाला आणि तेलुगू टायटन्सने महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. ३७व्या मिनिटाला हरयाणाचा कर्णधार विकास कंडोलाच्या सुपर १०च्या जोरावर तेलगू टायटन्सने दुसऱ्यांदा ऑलआऊट केले.
हेही वाचा – Padma Awards 2022 : नीरज चोप्राला पद्मश्री पुरस्कार; वाचा क्रीडाक्षेत्रात कुणाला मिळालाय हा सन्मान!
तेलुगू टायटन्सनेही शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानता अंतिम चढाईत विकास कंडोलाला चकवून रोमहर्षक सामना बरोबरीत सोडवला. दोन्ही संघांना प्रत्येकी ३ गुण मिळाले, मात्र हरयाणा स्टीलर्सने विजयाची सुवर्णसंधी गमावली. या सामन्यात विकास कंडोला आणि अंकित बेनिवाल यांनी १०-१० गुणांची कमाई केली. रोहित गुलिया, विनय आणि रोहित कुमार यांनी प्रत्येकी ८ गुण घेतले.