प्रो कबड्डी लीगच्या (PKL) ७२व्या सामन्यात, यू मुंबाने बंगळुरू बुल्सचा ४५-३४ असा पराभव करून पाचवा विजय नोंदवला आणि गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली. बंगळुरू बुल्सचा १५ सामन्यांमधला हा सहावा पराभव असला तरी ते पहिल्या स्थानावर कायम आहेत. यू मुंबाच्या सामन्यात अभिषेक सिंगने सुपर १० आणि राहुल सेतपालने हाय ५ मिळवत संघाच्या विजयात योगदान दिले.
पवन सेहरावतने यंदाच्या हंगामातील १५ सामन्यांमध्ये २०० रेड पॉइंट पूर्ण केले आणि अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला, पण तो संघाला मोठ्या पराभवापासून वाचवू शकला नाही. पहिल्या हाफनंतर यू मुंबाचा संघ २२-२० असा पुढे होता. यू मुंबाने सामन्याच्या पाचव्या मिनिटाला बंगळुरू बुल्सला ऑलआऊट करून १०-३ अशी जबरदस्त आघाडी मिळवून दिली. पण पवन सेहरावतने शानदार कामगिरी करत पहिल्या हाफमध्ये सुपर १० पूर्ण केला आणि संघाला सामन्यात परत आणले.
दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला यू मुम्बाने २२व्या मिनिटाला पुन्हा एकदा बंगळुरू बुल्सला ऑलआऊट करत सामन्यातील आपली आघाडी भक्कम केली. अभिषेक सिंगने चढाईत सुपर १० पूर्ण केला. ३७व्या मिनिटाला यू मुंबाने बुल्सला सामन्यात तिसऱ्यांदा ऑलआऊट करून त्यांच्या पुनरागमनाच्या आशा संपुष्टात आणल्या.
हेही वाचा – VIDEO : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा बॉल टॅम्परिंग; ICCनं सुनावणी कठोर शिक्षा!
उत्तरार्धात पवन सेहरावत जास्त छाप पाडू शकला नाही आणि त्यामुळे त्याच्या संघाला एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले. पवन व्यतिरिक्त, भरतला ७ गुण मिळाले. सौरभ नंदलने बचावात चार टॅकल पॉइंट घेतले. यू मुंबाच्या अभिषेक सिंगने चढाईत ११ गुण घेतले, तर राहुल सेतपालने चांगली कामगिरी करत बचावातील सात गुणांसह एकूण ८ गुण मिळवले.