गुजरात जायंट्सने प्रो कबड्डी लीगच्या (PKL 8) ८६व्या सामन्यात गतविजेत्या बंगाल वॉरियर्सचा ३४-२५ असा पराभव केला. गुजरातचा हा सलग दुसरा विजय आहे. गुजरातकडून रेडर अजय कुमारने ९ आणि प्रदीप कुमारने ७ गुण मिळवले. बंगालचा कर्णधार मनिंदर सिंगने ९ गुण मिळवले, मात्र उत्तरार्धात त्याच्या संघाचे खेळाडू गुजरातसमोर चमक दाखवू शकले नाहीत.
पूर्वार्धानंतर गुजरात जायंट्सने १३-१२ अशी आघाडी घेतली. मनिंदर सिंगला सामन्याच्या पहिल्या चढाईत दोन गुण मिळाले. त्यामुळे तो सामन्यात जबरदस्त खेळेल, असे वाटत होते. मात्र, गुजरात जायंट्सच्या बचावफळीने सातत्याने मनिंदर सिंगला बाद केले. उत्तरार्धात गुजरातच्या खेळाडूंनी दमदार खेळ दाखवत एकूण २१ गुण मिळवले. तर बंगालचा संघ केवळ १३ गुण मिळवू शकला.
हेही वाचा – रोहित शर्मानं मराठीत दिली शिवी..! विश्वास बसत नसेल तर नक्की पाहा
दुसऱ्या सामन्यात बंगळुरू बुल्सने यूपी योद्धाला ३१-२६ असे हरवले. या विजयामुळे बंगळुरू संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर यूपी योद्धाचा हा सलग तिसरा पराभव असून ते गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचले आहेत. या सामन्यात परदीप नरवाल फ्लॉप ठरला आणि त्याला केवळ ४ गुण मिळवता आले. हेच यूपी योद्धाच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले. या सामन्यात पवनने सर्वाधिक ९, अमनने ७, नितेश कुमार, श्रीकांत जाधव आणि भरतने प्रत्येकी ६ गुण मिळवले.
पहिल्या हाफनंतर बंगळुरू बुल्सने १८-१३ अशी आघाडी घेतली. बुल्ससाठी, पवन आणि भरत यांनी चढाईत संघाची जबाबदारी घेतली. उत्तरार्धात श्रीकांत जाधवने यूपी योद्धाला चांगली सुरुवात करून दिली आणि त्याला दोन टच पॉइंट मिळाले. पवन सेहरावतनेही चढाईत सलग गुण मिळवले. ऑलआऊट होण्याच्या जवळ असताना अमनने सुपर टॅकल करत बंगळुरू बुल्सला वाचवले. दरम्यान, त्याने हाय ५ देखील पूर्ण केला.
बुल्सने आपली आघाडी चांगलीच राखली. यूपी योद्धा ऑलआऊटच्या जवळ आला, परंतु सुमितने पवनकुमार सेहरावतला सुपर टॅकलद्वारे बाद केले. यूपीने पुनरागमनाचे अनेक प्रयत्न केले, परंतु बुल्सच्या बचावाने त्यांच्या आशा धुळीस मिळवल्या. सलग दोन सामने गमावल्यानंतर बुल्सने पहिला सामना जिंकला.