प्रो कबड्डी लीगच्या (PKL) ७५व्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने जयपूर पिंक पँथर्सचा ४१-२२ असा पराभव केला. या विजयासह ते पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. बंगालचा कर्णधार मनिंदर सिंग याने प्रो कबड्डी लीगमध्ये आपले ९०० रेड पॉइंट पूर्ण करत इतिहास रचला आहे. ही कामगिरी करणारा तो परदीप नरवाल, राहुल चौधरी, दीपक हुडा यांच्यानंतरचा चौथा रेडर ठरला आहे.
बंगाल वॉरियर्सने पहिल्या हाफनंतर १४-११ अशी आघाडी घेतली. दोन्ही संघांच्या रेडर्सनी बचावपटूंपेक्षा सरस कामगिरी केली. पूर्वार्धाच्या अखेरीस, जयपूर संघ ऑलआऊट जवळ पोहोचला होता. मनिंदर सिंगला पहिल्या चढाईत दोन टच पॉइंट मिळाले आणि यासह जयपूर पिंक पँथर्स संघ प्रथमच ऑलआऊट झाला. यानंतर मनिंदर सिंगने सुपर रेड करताना आणखी तीन टच पॉइंट घेतले. यादरम्यान मनिंदर सिंगने सुपर १० पूर्ण केले. मनिंदर सिंगच्या जबरदस्त चढाईच्या जोरावर बंगाल वॉरियर्सने २७व्या मिनिटाला जयपूर पिंक पँथर्सला दुसऱ्यांदा ऑलआऊट केले.
हेही वाचा – IPL 2022 : लखनऊ संघाचं नाव ठरलं..! मालक संजीव गोयंकांनी केली घोषणा; पाहा VIDEO
बंगाल वॉरियर्सने दुहेरी अंकात आघाडी घेतली आणि यासह त्यांच्या बचावपटूंनी फॉर्ममध्ये परतताना जयपूर पिंक पँथर्सवर दबाव आणला. बंगाल वॉरियर्सने सामन्याच्या ३७व्या मिनिटाला जयपूरला पुन्हा ऑलआऊट केले. मनिंदर सिंगने या सामन्यात सर्वाधिक १३ गुण मिळवले, अर्जुन देशवालनेही १० गुण मिळवले.
प्रो कबड्डीत आज रंगलेल्या दुसऱ्या सामन्यात पुणेरी पलटणनं दबंग दिल्लीविरुद्ध ४२-२५ असा एकतर्फी विजय नोंदवला. दिल्लीच्या बचावपटूंनी सुमार खेळ करत पुणे संघाला बढती दिली. या विजयासह पुणे संघाने पॉइंट टेबलमध्ये १०व्या स्थानी झेप घेतली आहे. पुणेरी पलटणनं मोठ्या फरकाने विजय मिळवत प्लेऑफच्या दिशेने पाऊल टाकले. पुणेरी पलटणकडून मोहित गोयतने १० गुण घेतले, तर अस्लम इनामदारला ८ गुण मिळवता आले. दिल्ली संघाकडून विजय मलिकने ८ तर नीरज नरवालला ६ गुण मिळाले.