प्रो कबड्डी लीगच्या (PKL 8) १००व्या सामन्यात, जयपूर पिंक पँथर्सने गुजरात जायंट्सचा ३६-३१ असा पराभव करून दणदणीत विजय नोंदवला. या विजयासह जयपूर संघाने प्लेऑफच्या दिशेने मजबूत पाऊल टाकले आहे. जवळपास सर्वच संघांना अंतिम ६ मध्ये जाण्याची संधी आहे.
या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार दीपक हुड्डाने इतिहास रचला. त्याने या मोसमात १०० रेड पॉइंट पूर्ण केले. जयपूर पिंक पँथर्सने पहिल्या हाफनंतर गुजरात जायंट्सविरुद्ध २०-१४ अशी आघाडी घेतली. दीपक निवास हुडाने चढाईत चांगली कामगिरी केली. गुजरातच्या बचावफळीने एकदा सुपर टॅकल करून संघाला ऑलआऊट होण्यापासून वाचवले, परंतु सामन्याच्या १९व्या मिनिटाला जयपूर पिंक पँथर्सने गुजरात जायंट्सला प्रथमच ऑलआऊट केले. यामुळे जयपूरला पहिल्या हाफअखेर ६ गुणांची महत्त्वाची आघाडी मिळाली.
हेही वाचा – ‘‘माझी ताकद संपली…”, वडिलांच्या निधनानंतर सुरेश रैनाची भावनिक पोस्ट!
सामन्याच्या ३३व्या मिनिटाला गुजरात जायंट्सने जयपूर पिंक पँथर्सला प्रथमच ऑलआऊट केले. मात्र, जयपूर पिंक पँथर्सने जोरदार प्रत्युत्तर दिले आणि आघाडी वाढवण्यासाठी गुण जमा करणे सुरूच ठेवले. परदीप कुमारने आपल्या संघाला सामन्यात पुनरागमन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मात्र संदीप धुलने निर्णायक क्षणी परदीप कुमारला बाद करून आपल्या संघाला दिलासा दिला. सामन्याच्या अंतिम चढाईत दीपक हुडाने सुपर १० पूर्ण केला आणि संघाला ५ गुणांनी विजय मिळवून दिला.
या सामन्यात दीपक निवास हुड्डाने सर्वाधिक ११ गुण मिळवले. त्याच्याशिवाय राकेश नरवालला ८, अर्जुन देशवालला ७ आणि अजय कुमारला ६ गुण मिळाले. दुसऱ्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने तेलुगू टायन्सशी ३२-३२ अशी बरोबरी पत्करली. बंगालचा कप्तान मनिंदर सिंगने ११ गुण मिळवले तर, टायटन्सच्या अंकित बेनिवालने ९ गुण मिळवले.
बंगाल विरुद्ध टायटन्स सामन्याच्या पूर्वार्धात बंगाल दोन गुणांनी पुढे होता. यात बंगालसाठी मनोज गौडाने सर्वाधिक चार रेड पॉइंट घेतले. कॅप्टन मनिंदर सिंगला केवळ तीन रेड पॉइंट मिळाले. अंकित बेनिवालने टायटन्ससाठी सर्वाधिक चार रेड पॉइंट घेतले. चढाई आणि बचाव या दोन्ही प्रकारात दोन्ही संघ जवळपास बरोबरीत होते आणि टायटन्सला अतिरिक्त गुण मिळाला.
दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाच बंगाल ऑलआऊट झाला आणि टायटन्सने चार गुणांची आघाडी घेतली. शेवटच्या पाच मिनिटांत मनिंदरच्या कामगिरीमुळे बंगालने टायटन्सला ऑलआऊट केले. मात्र अंतिम चढाईत टायटन्सने सामना बरोबरीत सोडवला.