प्रो कबड्डी लीगच्या (PKL 8) ९२व्या सामन्यात, हरयाणा स्टीलर्सने बंगाल वॉरियर्सचा ४६-२९ असा पराभव करून एकतर्फी विजय नोंदवला. बंगाल वॉरियर्सचा कर्णधार आणि अनुभवी खेळाडू मनिंदर सिंगने इतिहास रचला आणि या मोसमात २०० रेड पॉइंट पूर्ण केले. या सामन्यात मनिंदरने सर्वाधिक १३ गुण घेतले. तर हरयाणा स्टीलर्ससाठी विकास कंडोलाने १० गुण मिळवले.
पहिल्या सत्रात बंगाल आणि हरयाणा संघ १९-१९ असा बरोबरीत होता. हरयाणा स्टीलर्सने दुसऱ्या हाफची सुरुवात चांगली केली. त्यांनी बचाव करताना सुकेश हेगडेला बाद केले आणि त्यानंतर अबोझर मिघानीलाही चढाईत बाद केले. मनिंदर सिंगच्या सेल्फआऊटने बंगाल वॉरियर्सलाही धक्का बसला. मोहम्मद नबीबक्षने बंगाल वॉरियर्ससाठी उत्कृष्ट कामगिरी केली आणि मनिंदरला पुन्हा मैदानात आणले.
हरयाणा स्टीलर्सने सामन्यातील महत्त्वाच्या वेळी सलग गुण मिळवत आघाडी घेतली. यामुळे बंगाल वॉरियर्सच्या ऑलआऊटजवळ आला. विकास कंडोलाने एकाच चढाईत बंगाल वॉरियर्सच्या दोन्ही खेळाडूंना बाद करून ऑलआऊट केले. मनिंदर सिंगने सुपर रेड करून आपल्या संघाला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, हरयाणा स्टीलर्सने बंगाल वॉरियर्सला एकही संधी दिली नाही आणि सातत्याने आपल्या खेळाडूंना बाद केले.
हेही वाचा – भारताचा संघ निवडताना गांगुली करतो ढवळाढवळ? वाचा BCCIच्या ‘दादा’नं स्वत: दिलेलं उत्तर!
दुसऱ्या सामन्यात दबंग दिल्लीने बंगळुरू बुल्सला शेवटच्या क्षणी मागे खेचत ३६-३६ अशी बरोबरी साधली. शेवटचे काही सेकंद शिल्लक असताना बंगळुरूकडे एका गुणाची आघाडी होती, तेव्हा मनजित चिल्लरने बंगळुरूचा स्टार रेडर पवन सेहरावतला टॅकल करत मौल्यवान एक गुण मिळवला. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. या बरोबरीमुळे दबंग दिल्लीने गुणतालिकेतील पहिले स्थान राखले आहे.
या सामन्यात पवन सेहरावते १७ गुण घेतले. तर दिल्लीच्या नवीन कुमारने १३ गुणांची कमाई केली. दिल्लीकडून जोगिंदर सिंग आणि मनजित चिल्लर यांनी अनुक्रमे ४ आणि ३ गुणांची कमाई केली.