प्रो कबड्डी लीगच्या (PKL 8) ९५व्या सामन्यात, यू मुंबाने तमिळ थलायवाजचा ३५-३३ असा पराभव करत रोमांचक विजय नोंदवला. या सामन्यात यू मुंबाचा कर्णधार फजल अत्राचलीने इतिहास रचला. त्याने प्रो कबड्डी लीगच्या इतिहासात ३५० टॅकल पॉइंट पूर्ण केले आणि असे करणारा तो मनजीत चिल्लर नंतरचा दुसरा खेळाडू ठरला. शिवाय असा पराक्रम करणारा तो पहिला विदेशी खेळाडू आहे.
या सामन्यात अभिषेक सिंगने सर्वाधिक १०, व्ही अजित कुमार, अजिंक्य पवार आणि मनजीतने प्रत्येकी ७ गुण मिळवले. सागरने बचावात ४ गुण मिळवले, परंतु या सामन्यात एकाही खेळाडूला हाय ५ किंवा सुपर १० मिळवता आला नाही.
दुसऱ्या सामन्यात यूपी योद्धाने तेलुगू टायटन्सचा ३९-३५ असा पराभव केला. सलग ४ सामने गमावल्यानंतर यूपी योद्धाने पहिला सामना जिंकला. या सामन्यात सुरेंदर गिल आणि रजनीश यांनी सुपर १० पूर्ण केले. बचावात कोणत्याही खेळाडूला हाय ५ घेता आला नाही. परदीप नरवाल फ्लॉप ठरला आणि त्याला केवळ ३ गुण मिळवता आले.
प्रो कबड्डी लीगच्या (PKL 8) ९७ व्या सामन्यात, हरयाणा स्टीलर्सने जयपूर पिंक पँथर्सचा ३५-२८ असा पराभव करून आठव्या विजयाची नोंद केली आणि गुणतालिकेत चौथे स्थान मिळवले. जयपूर पिंक पँथर्सलाही या सामन्यातून एक गुण मिळाला आणि ते सातव्या स्थानावर पोहोचले आहेत. हरयाणा स्टीलर्सचा कर्णधार विकास कंडोलाने सुपर १० कामगिरी केली.
हेही वाचा – VIDEO : अंडर १९ वर्ल्डकप फायनलमध्ये महाराष्ट्राच्या कौशल तांबेनं घेतलेला ‘कडक’ कॅच पाहिला का?
जयपूर पिंक पँथर्ससाठी अर्जुन देशवाल फ्लॉप ठरला आणि त्याला फक्त ६ रेड पॉइंट मिळू शकले. बचावफळीत, कर्णधार संदीप धुलने चमकदार कामगिरी करत हाय ५ सह ६ टॅकल पॉइंट घेतले, परंतु तो संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. दीपक हुडाही दुसऱ्या हाफमध्ये फ्लॉप ठरला. या हंगामात जयपूर पिंक पँथर्सने आधी हरयाणा स्टीलर्सचा ४०-३८ असा पराभव केला, पण आज हरयाणा संघाने त्या पराभवाचा बदला घेतला.