प्रो कबड्डी लीगमध्ये यूपी योद्धाने यू मुंबावर ३५-२८ असा रोमांचक विजय नोंदवला. यासह यूपी योद्धाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला असून यू मुंबाचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. यू मुंबा स्पर्धेबाहेर होणारा चौथा संघ ठरला आहे. पीकेएलमधील यूपी योद्धाचा हा चौथा हंगाम आहे आणि प्रत्येक वेळी संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव संघ ठरला आहे. या सामन्यात परदीप नरवाल फ्लॉप ठरला आणि त्याला केवळ ६ गुण मिळवता आले. सुरेंदर गिलने सर्वाधिक ७ रेड पॉइंट्स केले.
पूर्वार्धानंतर यूपी योद्धाने यू मुंबाविरुद्ध १८-१२ अशी आघाडी घेतली. परदीप नरवालने सामन्याची शानदार सुरुवात केली आणि त्याने सुपर रेडसह तीन गुण मिळवले. यू मुंबानेही चांगले पुनरागमन केले आणि व्ही अजित कुमारने त्यांच्यासाठी चढाईत गुण मिळवले. पूर्वार्ध संपण्यापूर्वी यू मुंबाला यूपी योद्धाने ऑलआऊट केले.
हेही वाचा – IND vs WI : खुशखबर..! तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी BCCIनं घेतला ‘मोठा’ निर्णय
यू मुंबाने दुसऱ्या सत्राची सुरुवात चांगली केली. आधी त्यांनी सुरेंदर गिलला टॅकल केले, मग अभिषेक सिंगने मल्टी पॉइंट रेड घेतली आणि मग परदीप नरवाललाही टॅकल केले. अखेरीस, सामना अतिशय रोमांचक झाला, परंतु यूपी योद्धाने बचाव आणि चढाईत चमकदार कामगिरी करून आपल्या संघाला आघाडी मिळवली. सामन्याच्या शेवटच्या चढाईत सुरेंदर गिलने यू मुंबाच्या दोन्ही बचावपटूंना बाद केले आणि त्यामुळे मुंबाचा संघ ऑलआऊट झाला. युपी योद्धाने हा सामना रोमहर्षक पद्धतीने जिंकला.
दुसऱ्या सामन्यात बंगळुरू बुल्सने हरयाणा स्टीलर्सचा ४६-२४ असा धुव्वा उडवला. बंगळुरूचा स्टार रेडर पवन सेहरावतने सर्वाधिक २० गुणांची कमाई केली. यात त्याने ५ टॅकल आणि ४ बोनस घेतले. भरतने त्याला ८ गुण घेत चांगली साथ दिली.