आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रात अव्वल दर्जाचे नैपुण्य भारतात आहे मात्र त्या नैपुण्यास आकार देण्यासाठी नियोजनबद्ध विकासाची आवश्यकता आहे. त्याकरिता खेळाडू, प्रशिक्षक व संघटक यांच्यात योग्य समन्वयही आवश्यक आहे हे मत व्यक्त केले आहे भारताचे ज्येष्ठ टेनिसपटू आनंद अमृतराज यांनी.
आनंद व विजय अमृतराज या बंधूंनी एकेकाळी आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये विशेषत: डेव्हिस चषक लढतींमध्ये वर्चस्व गाजविले होते. महाराष्ट्र टेनिस प्रीमिअर लीगच्या निमित्ताने आनंद हे नुकतेच पुण्यात आले होते. या स्पर्धेतील मुंबई ब्लास्टर्स संघास त्यांचे मार्गदर्शनही लाभले. देशातील टेनिस क्षेत्राची प्रगती तसेच खेळाडूंनी केलेली प्रगती याबाबत त्यांनी ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीशी मनमोकळेपणाने गप्पागोष्टी केल्या.
भारतीय टेनिसपटूंच्या कामगिरीबाबत आपण समाधानी आहात काय?
भारतीय टेनिसपटूंच्या कामगिरीबाबत मी अपेक्षेइतका समाधानी नाही. आपल्या देशात गेल्या दहा वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भरपूर टेनिस स्पर्धा आयोजित केल्या जाऊ लागल्या आहेत मात्र आपल्या खेळाडूंची कामगिरी अपेक्षेइतकी होत नाही. खेळाडूंनी केवळ पैसा मिळविणे हे ध्येय डोळ्यासमोर न ठेवता देशाचा नावलौकिक कसा उंचावता येईल यावर अधिक भर दिला पाहिजे. लिएंडर पेसने १९९६ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविले मात्र त्यानंतर एकही भारतीय खेळाडू टेनिसमध्ये पदकापर्यंत पोहोचू शकला नाही. पदक मिळविण्यासाठी कठोर मेहनत, संघ निष्ठा व महत्त्वाकांक्षा याची आवश्यकता आहे.
तुमच्या वेळच्या सुविधा व हल्ली मिळणाऱ्या सुविधा याबाबत काय सांगता येईल?
आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे अशी सध्याची स्थिती आहे. आमच्या वेळी देशात टेनिसचे फारसे सामने होत नसत. त्यामुळे सुविधाही फारशा नव्हत्या. आता खेळाडूंना प्रशिक्षक, फिजिओ, मसाजिस्ट, मानधनाची हमी, ट्रेनर आदी सर्व काही सुविधा मिळत आहेत. आता हा खेळ खऱ्या अर्थाने व्यावसायिक झाला असला तरी खेळाडूंनी अल्प यशावर समाधान मानू नये. पेस, महेश भूपती यांच्यासारखे खेळाडू अजूनही स्पर्धात्मक टेनिस खेळत आहेत. हल्ली एक-दोन वर्षे स्पर्धात्मक कारकीर्द झाली नाही तोच खेळाडू प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसू लागतात. प्रशिक्षक झाल्यानंतर पैसा सहज मिळत असला तरी स्पर्धात्मक कारकिर्दीकडे त्यांनी दुर्लक्ष करू नये. परदेशातील अनेक अव्वल दर्जाचे खेळाडू प्रशिक्षक म्हणून कार्यरत असले तरी स्पर्धात्मक कारकिर्दीवर ते पाणी सोडत नाहीत.
एके काळी डेव्हिस स्पर्धेत भारतीय संघ आव्हानात्मक प्रतिस्पर्धी मानला जात होता. आता मात्र आपला संघ कमकुवत दिसून येतो याचे कारण काय असेल?
डेव्हिस चषक स्पर्धेत एकेरी व दुहेरी या दोन्ही प्रकारच्या लढतींना महत्त्व आहे. गेल्या काही वर्षांमध्ये फक्त आपण दुहेरीच्या लढतींवरच लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. डेव्हिस स्पर्धेत एकेरीचे चार सामने असतात हे संघटकांनी विसरू नये. सर्बिया, स्पेन, अमेरिका आदी देशांसारखी आपल्याकडे खेळाडूंची खाण नाही. पेस-भूपती यांच्यासारखी कामगिरी करण्याची क्षमता असलेले खेळाडू आपल्याकडे अजून तयार होत आहेत. आमच्या वेळी शशी मेनन, रामनाथ कृष्णन असे अनेक अव्वल दर्जाचे खेळाडू होते. देशातील आंतरराष्ट्रीय व अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धाची संख्या वाढली व सहभागी खेळाडूंची संख्या वाढली तरी खेळात गुणवत्ता किती वाढली हे अधिक महत्त्वाचे आहे.
संघटना स्तरावर प्रतिनिधी म्हणून खेळाडूंना कितपत संधी दिली जाते?
आमच्या वेळी संघ निवडीच्या प्रक्रियेत किंवा अन्य धोरणे ठरविण्याबाबत आम्हाला हक्क नव्हता तरीही खेळाडूंचे हित ही अतिशय प्राधान्याची गोष्ट मानली जात असे. आम्हीही देशासाठी खेळण्यास प्राधान्य देत होतो. आता खेळाडू व संघटक यांच्यातील मतभेद चव्हाटय़ावर आले आहेत ही खेळाच्या दृष्टीने लाजिरवाणी गोष्ट आहे. दोन्ही बाजूंनी एक पाऊल मागे येत तडजोड करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. जाहीर भांडणांमुळे देशाची बदनामी होत आहे.
टेनिसपटू व दुखापती यांचे अतूट नाते सध्या दिसत आहे त्याविषयी काय सांगता येईल?
खेळाडूंनी फक्त स्पर्धात्मक टेनिसला प्राधान्य न देता आपली शारीरिक तंदुरुस्तीही महत्त्वाची आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. सानिया मिर्झा, सोमदेव देववर्मन आदी खेळाडूंना दुखापतींमुळे अनेक प्रतिष्ठेच्या स्पर्धावर पाणी सोडावे लागले आहे. शरीर तंदुरुस्त असेल तर आपोआपच तुमची कामगिरी अव्वल दर्जाची होऊ शकते.